BWF Toilet Break Rules Menstrual Health Women Badminton Issues: कोणत्याही क्रीडा प्रकारात मासिक पाळी असताना महिलांसाठी खेळणं किती त्रासदायक असतं, याबद्दल अनेकदा खेळाडूंनी भाष्य केलं आहे. आता यादरम्यान बॅडमिंटन खेळादरम्यान महिला खेळाडूंना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, याबाबत डेन्मार्कची बॅडमिंटनपटू मिया ब्लिचफेल्ड्ट हिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनला सांगत त्यांच्या नियमांसाठी जाब विचारला आहे.

जानेवारीत दिल्ली येथे झालेल्या इंडिया ओपनच्या आयोजनावर टीका करणारी डेन्मार्कची बॅडमिंटनपटू मिया ब्लिचफेल्ड्ट आता महिलांच्या प्रश्नांवरून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF)लाही जाब विचारत आहे. यासाठी तिने Women’s Badminton Collective (WBC) नावाची संस्था सुरू केली आहे. या उपक्रमातून तिने पहिलं मोठं पाऊल उचलत चीनची स्टार हुआंग डोंग पिंग हिला महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी पुढे आणलं. हुआंग डोंग पिंगने २०२१ टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीचं सुवर्णपदक जिंकलं असून ती तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदकविजेती आहे.

“BWFने जर एखादा नियम बदलावा, असं मला वाटत असेल, तर महिलांसाठी बॅडमिंटन अधिक अनुकूल करण्यासाठी मासिक पाळीचा विचार केला पाहिजे. कधीकधी आम्हाला वॉशरूममध्ये जावं लागतं आणि सध्या मिळणारा कमी ब्रेक असल्यामुळे ते कठीण होतं. सुदीरमन कपदरम्यान माझ्यासोबत असंच घडलं,” असं हुआंगने WBCला सांगितलं.

तिने पुढे सांगितलं की, स्कॉटलंडच्या खेळाडू क्रिस्टी गिलमोरलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे महिला खेळाडूंसाठी हा केवळ शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक मुद्दा असल्याचं तिने अधोरेखित केलं. सध्या बॅडमिंटनमध्ये स्वतंत्र टॉयलेट ब्रेकची तरतूद नाही. खेळाडू ११ गुणांच्या ब्रेकवेळी मिळणाऱ्या ६० सेकंदांच्या विश्रांतीत, किंवा प्रत्येक २१ गुणांच्या गेमनंतर मिळणाऱ्या १२० सेकंदांच्या ब्रेकमध्ये वॉशरूम वापरण्यासाठी परवानगी मागू शकतात.

दरम्यान, BWFने नियमांमध्ये बदल करायचा की नाही, यावर अद्याप चर्चा आणि पुनर्विचार होणं बाकी आहे. मात्र, दिल्लीतील आयोजकांनी महिलांच्या मासिक पाळीच्या वास्तवाचा विचार करत एक छोटा पण महत्त्वाचा बदल केला आहे. मात्र, बॅडमिंटनमधील मासिक पाळी आणि टॉयलेट ब्रेकचा मुद्दा अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय आहे. या चर्चेत भारत आणि चीनसारखे आशियाई देश तसेच डेन्मार्कसारखा युरोपियन देश महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (BAI) प्रवक्त्याने सांगितलं की, खेळाडू, लाइनवुमन, अधिकारी किंवा प्रेक्षकांसाठी असलेल्या प्रत्येक महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन्स खुल्या ट्रेमध्ये ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून गरज पडल्यास महिलांना तातडीने त्याचा वापर करता येईल. मासिक पाळीबाबतचा संकोच आणि गैरसमज दूर करून, हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक भाग आहे, हे स्वीकारण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हुआंग डोंग पिंगने या मुद्द्यावर बोलताना मिश्र दुहेरीतील परिस्थितीचा वेगळा पैलूही मांडला. “मिश्र दुहेरी खेळताना मी कोर्टवर पुरुष आणि महिला असा भेद करत नाही. आम्ही ज्यासाठी खेळतो, त्यात पुरुष किंवा महिला नसतात, फक्त विजय महत्त्वाचा असतो. मात्र, शारीरिकदृष्ट्या आपण वेगळे आहोत, हे मान्य करावंच लागेल,” असं तिने सांगितलं.

ती पुढे म्हणाली, “मिश्र दुहेरीमध्ये महिला खेळाडू म्हणून माझ्यासोबत आणि माझ्या महिला प्रतिस्पर्ध्यासोबत काही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात, ज्या पुरुष खेळाडूंसोबत होत नाहीत, कारण कधीकधी आम्ही मासिक पाळीच्या काळातही खेळत असतो. सध्याचे टॉयलेट ब्रेकचे नियम खूप कठोर आहेत आणि त्यात लवचिकता असण्याची गरज आहे.”