Phil Salt Catch: आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनने मिळून डाव सांभाळला. ही भागीदारी मोडून काढण्यासाठी फिल सॉल्टने बाऊंड्री लाईनवर भन्नाट कॅच घेतला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडतं. छोटं मैदान आणि हैदराबादच्या ताफ्यात असलेले स्फोटक फलंदाज पाहता हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण बंगळुरूच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि हैदराबादच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. पहिलाच सामना खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज जेकब डफीने ३ प्रमुख फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर रोमारियो शेफर्डने हेनरिक क्लासेनची विकेट मिळवून दिली.
तर झाले असे की, हैदराबादला २९ धावांवर तिसरा धक्का बसल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. त्याने इशान किशनसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. दरम्यान हैदराबादकडून १४ वे षटक टाकण्यासाठी रोमारियो शेफर्ड गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्लासेनने मोठा प्रहार केला. गुड लेंथवर टाकलेल्या चेंडूवर क्लासेनने मिड विकेटच्या वरुन षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू खूप उंच गेला. पण षटकार जाईल इतका लांब गेला नाही. बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फिल सॉल्टने खाली बसून भन्नाट कॅच घेतला. या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात घेतलेल्या या कॅचला कॅच ऑफ द टूर्नामेंट म्हटलं जात आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक/कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलिल अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा
