Phil Salt Catch: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू फिल सॉल्टचा बोलबाला पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करताना तो स्वस्तात माघारी परतला. पण पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना त्याने डाईव्ह मारून २ भन्नाट कॅच घेतले. या भन्नाट कॅचचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आधी त्याने हेनरिक क्लासेनला माघारी धाडलं. त्यानंतर इशान किशनला बाद केलं.

पहिल्या डावात गोलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १४ वे षटक टाकण्यासाठी रोमारियो शेफर्ड गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फटका थोडक्यात फसला. बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असताना फिल सॉल्टने खाली बसून अविश्वसनीय झेल घेतला. अंपायरने रिप्लेची मागणी केली. त्यानंतर क्लासेनला बाद घोषित करण्यात आलं. क्लासेन २२ चेंडूंमध्ये ३१ धावांची खेळी करून माघारी परतला.

क्लासेनचा भन्नाट झेल घेतल्यानंतर, सॉल्टने आणखी एक भन्नाट झेल घेतला. यावेळी फलंदाजीला सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन होता. इशान किशनने या डावात दमदार फलंदाजी केली. त्याने ८० धावांची खेळी केली. इशानकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण नेमकं तेव्हाच अभिनंदन सिंगने टाकलेल्या चेंडूवर फिल सॉल्टने डाईव्ह मारून एका हाताने भन्नाट झेल घेतला. हा चेंडू वेगाने बाऊंड्री लाईनच्या दिशेने जात होता. नेमकं तेव्हाच सॉल्टने हवेत झेप घेतली आणि एका हाताने झेल घेतला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरूकडून फिल सॉल्ट अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ६९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. तर देवदत्त पडिक्कलने ६१ धावांची दमदार खेळी केली. रजत पाटीदारने ३१ धावा केल्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ गडी राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत खातं उघडलं.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेड अवघ्या ११ धावा करत माघारी परतला. तर अभिषेक शर्मा ७ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनने ८० धावांची दमदार खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३१ धावांची खेळी केली. शेवटी अनिकेत वर्माने ४१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २०१ धावांवर पोहोचवली.