उसळता चेंडू खेळताना मानेवर चेंडू आदळून झालेल्या दुर्दैवी अपघातात प्राण गमावणाऱ्या फिलीप ह्य़ुजेस याच्यावरील अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राऊंड क्रिकेट चाहत्यांकरिता खुले असणार आहे.
‘डेली टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार सिडनी येथील मैदानावर चॅनेल नाइन वाहिनीचे प्रक्षेपण मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार विधी ह्य़ुजेसच्या मूळ गावी मॅक्सव्हिले गावी होणार आहेत.
सिडनी येथील मैदानातच सुरू असलेल्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान शॉन अबॉटच्या उसळत्या चेंडूचा सामना करताना ह्य़ुजेस मैदानात कोसळला. मानेला झालेल्या गंभीर स्वरूपाच्या दुखापतीमुळे अद्ययावत उपचारानंतरही ह्य़ूजेसने प्राण गमावले.
‘याच मैदानावर ह्य़ुजेसने प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले होते. याच मैदानावर त्याने ऑस्ट्रेलियातला पहिला कसोटी सामना खेळला होता. अन्य सामन्यांच्या तुलनेत त्याने सिडनी मैदानावर सर्वाधिक सामने खेळले.
फिलीपला आदरांजली वाहण्यासाठी न्यू साऊथ वेल्स परिसरातील लोकांना आम्ही आवाहन केले आहे,’ असे सिडनी क्रिकेट ग्राऊंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी बर्कले यांनी सांगितले.