‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी अटक करण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत आणि राजस्थान रॉयल्सच्या दोन खेळाडूंसहित अन्य दहा जणांच्या पोलीस कोठडीमध्ये दिल्ली न्यायालयाने आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे.
महानगर दंडाधिकारी सौम्या चौहान यांनी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये २६ मेपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीप्रसंगी श्रीशांत तणावाखाली जाणवत होता. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाच्या आणखी चौकशीच्या दृष्टीने आरोपी पोलिसांच्या ताब्यात असण्याची आवश्यकता आहे, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.
राकेश ऑबेरॉय, दिपित गर्ग, अजय गोएल आणि अमित गुप्ता या अटक करण्यात आलेल्या चार बुकींची न्यायालयाने ४ जूनपर्यंत तुरुंगात रवानगी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने या चौघांची चौकशी केली.
पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे तीन क्रिकेटपटू आणि ११ बुकींना मंगळवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. १५वा आरोपी माजी रणजीपटू बाबुराव यादवला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली.
पाच दिवसांची आणखी पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी सांगितले की, चौकशी योग्य मार्गावर सुरू असून, खेळाडू आणि बुकींच्या संवादाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. आम्ही आरोपींच्या आवाजांचे नमुने घेतले असून, त्याची तपासणी करीत आहोत.