Piyush Chawla Announced Retirement: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे दोन माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला होता. या दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतर, दोन विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य लेग-स्पिनर पीयूष चावलानेही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारताने २००७ मध्ये जिंकलेला पहिला टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये वानखेडे मैदानावर जिंकलेल्या एकदिवसीय संघाचा पीयूष चावला महत्त्वाचा सदस्य होता. पीयूष चावलाने आज इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.
पीयूष चावला भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे तिन्हा प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ३ कसोटी, २५ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. या तिन्ही स्वरूपात त्याने अनुक्रमे ७, ३२ आणि ४ विकेट घेतल्या आहेत.
पीयूष चावलाने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्स) यासारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. पीयूषने १९१ आयपीएल सामन्यांमध्ये १९२ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर आयपीएलमध्ये तो इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये, पीयूष चावलाने क्रिकेटमधील त्याच्या २० वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आणि गेल्या काही वर्षात तो ज्या संघांसोबत खेळला आहे त्यांचे आभार मानले.
तो म्हणाला, “मैदानावर दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर, या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ च्या टी२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होण्यापर्यंत, या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण हा एका आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. या आठवणी माझ्या हृदयात कायमच्या कोरल्या जातील.”
यावेळी पीयूष चावलाने तो ज्या आयपीएल संघांकडून खेळला त्यांचेही आभार मानले आहेत. पोस्टमध्ये तो म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे मनापासून आभार. इंडियन प्रीमियर लीग माझ्या कारकिर्दीतील खरोखरच एक खास अध्याय आहे आणि मी त्यातील प्रत्येक क्षण जपला आहे.”