scorecardresearch

Pro Kabaddi League : पुणेरी पलटणनं बंगाल संघाला दाखवला इंगा; ३९-२७ अशी सहज चारली धूळ!

पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना १७ गुण मिळवले.

Pro Kabaddi League : पुणेरी पलटणनं बंगाल संघाला दाखवला इंगा; ३९-२७ अशी सहज चारली धूळ!
पुणेरी पलटननं बंगाल वॉरियर्सला पराभूत केलं.

पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल ८) ४३व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा ३९-२७ असा पराभव केला. या विजयासह पुणेरी पलटणचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे, तर दुसरीकडे बंगाल वॉरियर्सचा संघ आठव्या स्थानावर कायम आहे. पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना १७ गुण मिळवले. बंगालच्या मनिंदर सिंगची १३ गुणांची चांगली कामगिरी व्यर्थ गेली. त्याच्याशिवाय आकाश पिकलमुंडेनेही ८ गुण मिळवले.

पुणेरी पलटणने पूर्वार्धात २०-११ अशी आघाडी घेतली. मनिंदर सिंगने बंगालसाठी चांगली सुरुवात केली आणि सुरुवातीच्या सत्रात सुपर रेड मारून पुणेरी पलटणला ऑल आऊटच्या जवळ आणले. पण, पुणेरी पलटणने पुनरागमन केले. त्यांनी प्रथम मोहम्मद इस्माईल नबीबक्ष आणि नंतर मनिंदर सिंगला सुपर टॅकलद्वारे बाद केले. १६व्या मिनिटाला पुणेरी पलटणने सामन्यात प्रथमच बंगाल वॉरियर्सला ऑलआऊट केले.

पुणेरी पलटणने दुसऱ्या सत्राची जोरदार सुरुवात केली आणि २३व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले. अस्लम इनामदार कारकिर्दीतील पहिला सुपर १० लगावला. मनिंदर सिंगने दोन गुणांसह सुपर १० पूर्ण केला. त्यामुळे बंगाल वॉरियर्सला पुणेरी पलटणला ऑलआऊट करण्याची संधी होती. मात्र, अस्लम इनामदारने आपल्या संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवले.

हेही वाचा – धक्कादायक..! बॉक्सिंग करताना झाली गंभीर दुखापत, आधी कोमात गेला आणि १० दिवसांनी झाला मृत्यू

मनिंदर सिंगने सातत्याने आपल्या संघासाठी गुण मिळवले, पण त्याला बचावाकडून अजिबात साथ मिळाली नाही. पुणेरी पलटणने पुन्हा एकदा सुपर टॅकलने आपली आघाडी वाढवली. शेवटी पुणेरी पलटणने सामना सहज जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pkl 2021 22 puneri paltan vs bengal worriors latest score adn