scorecardresearch

Pro Kabaddi League : पाटणा पायरेट्स सुसाट; बंगालला ३८-२९ असं हरवलं!

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं बंगळुरू बुल्सला मात दिली.

Pro Kabaddi League : पाटणा पायरेट्स सुसाट; बंगालला ३८-२९ असं हरवलं!
प्रो कबड्डी लीग

पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ९८व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सचा ३८-२९ असा पराभव केला. या सामन्यातही पाटणा पायरेट्सने ८व्या हंगामातील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि बंगाल वॉरियर्सला एकही संधी दिली नाही. मोहम्मदर्झा शादलूने सलग तिसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करत हाय ५ पूर्ण केला.

पूर्वार्धानंतर पाटणा पायरेट्सचा संघ २१-११ असा आघाडीवर होता. पायरेट्सने १८व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सला ऑलआऊट केले आणि त्यामुळे त्यांना चांगली आघाडी घेण्याची संधी मिळाली. बंगाल वॉरियर्ससाठी, मनिंदर सिंगला पहिल्या हाफमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही.

दुसऱ्या सत्रात पाटणाने आपली आघाडी कायम राखली. ३०व्या मिनिटाला पाटणा संघ २७-१७ असा पुढे होता. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंग या सामन्यात फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ४ गुण घेता आले. मनोज गौडाने शानदार कामगिरी करताना सामन्यात ९ गुण घेतले, तर मोहम्मद नबीबक्षने सामन्यात ८ रेड पॉइंट घेतले. मात्र, चांगली कामगिरी करूनही संघाला एकतर्फी पराभव टाळता आला नाही.

हेही वाचा – IND vs WI 1st ODI : रोहित-विराटमध्ये खरंच आहे वाद? हा VIDEO तुमचे डोळे उघडेल!

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने बंगळुरू बुल्सला ४०-३६ अशी मात दिली. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ होत होते. मात्र शेवटच्या क्षणी गुजरातने बाजी मारत हा सामना खिशात टाकला. गुजरातकडून प्रदीप कुमारने १४ गुण घेतले. तर अजय कुमारला ८ गुण घेता आले. बंगळुरूकडून पवन सेहरावतने १२ तर भरतने ११ गुणांची कमाई केली. या विजयासह गुजरात गुणतालिकेत ११व्या तर बंगळुरू बुल्स तिसऱ्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2022 at 21:48 IST

संबंधित बातम्या