पुढील पाच वर्षे खेळण्याचे धोनीचे संकेत

४० वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने यंदा चौथ्यांदा ‘आयपीएल’ जिंकली.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि ‘आयपीएल’मधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळण्याची इच्छा प्रकट केली आहे. परंतु ही अंतिम लढत पुढील वर्षी अथवा येणाऱ्या पाच वर्षांत कधीही खेळू, असे विधान करत धोनीने निवृत्तीबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला आहे.

४० वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने यंदा चौथ्यांदा ‘आयपीएल’ जिंकली. त्यावेळीसुद्धा धोनीने चेन्नईच्या प्रेक्षकांसमोर अखेरची लढत खेळण्याचा मानस व्यक्त केला होता. शनिवारी तमिळनाडूमधील एका कार्यक्रमात धोनीने पुन्हा या विषयावर भाष्य केले. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा, माजी क्रिकेटपटू कपिल देव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘‘चेन्नईच्या चाहत्यांनी नेहमीच आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आहे. कारकीर्दीतील घरच्या मैदानावरील अखेरचा एकदिवसीय सामना मी रांची येथे खेळलो. त्यामुळे आता अखेरचा ट्वेन्टी-२० सामना चेन्नईच्या जर्सीत चेपॉकवर खेळायला आवडेल. परंतु तो सामना पुढील पाच वर्षांत कधीही येऊ शकतो,’’ असे धोनी म्हणाला.

पुढील ‘आयपीएल’ भारतात

‘आयपीएल’चा १५वा हंगाम भारतात खेळवण्यात येईल, जय शहा यांनी सांगितले. ‘‘आयपीएलच्या १५व्या हंगामाची लिलावप्रक्रिया लवकरच होईल. परंतु पुढील वर्षी ही स्पर्धा नक्कीच भारतात होईल. त्यामुळे चेन्नईचे चाहते धोनीला खेळताना पाहू शकतील,’’ असे शहा म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Play next five years chennai super kings captain mahendra singh dhoni akp

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या