आपल्या देशाचं आकारमान खंडप्राय असं. १४० कोटी नागरिकांच्या देशात क्रिकेट म्हणजे जणू धर्मच. एवढ्या प्रचंड लोकांमधून भारतीय संघात निवड होणं हेच मुळात अतिदुर्मीळ. बडोद्याच्या या उमद्या शिलेदाराची भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीमुळेच त्याला ही संधी देण्यात आली. दुसऱ्या कसोटीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या शिलेदाराने पदार्पण केलं. तो भारतासाठी खेळला पण भारतासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या सूचीत त्याचं नाव नाही. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. जाणून घेऊया काय नक्की घडलं.

२००१ मध्ये भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. तीन सामन्यांची कसोटी मालिका होती. या मालिकेत जे घडलं ते भारतीय क्रिकेटसाठी आणि पर्यायाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर मूलगामी परिणाम करणारं होतं. या मालिकेदरम्यान जे घडलं त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बीसीसीआयचं वर्चस्व खऱ्या अर्थाने सिद्ध झालं. हे वर्चस्व पुढेही अनेक वर्ष कायम राहील हे या घटनेनं सिद्ध झालं.

पोर्ट एलिझाबेथ झालेल्या दुसऱ्या कसोटीत सामनाधिकारी माईक डेनेस यांनी भारतीय खेळाडूंवर अति अपील करत असल्याचा ठपका ठेवला. डेनेस यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर बॉल कुरतडत असल्याचा आरोप ठेवला. या आरोपामुळे क्रिकेटविश्व ढवळून निघालं. भारतात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. सोशल मीडिया नसतानाही या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. बीसीसीआयची सूत्रं जगमोहन दालमिया यांच्या हाती होती. त्यांनी परिस्थिती ओळखली आणि कृती केली. पुढच्या म्हणजेच सेंच्युरियन इथे होणाऱ्या कसोटीत डेनेस सामनाधिकारी नसतील अशी व्यवस्था दालमिया यांनी केली. मात्र आयसीसीने बीसीसीआयच्या वर्चस्वापुढे शरणागती पत्करली नाही. आयसीसीने या कसोटीचा अधिकृत दर्जाच काढून घेतला.

डेनिस यांनी केलेली कारवाई समजून घेणं आवश्यक आहे. संघातील खेळाडूंच्या वर्तनावर नियंत्रण न ठेवल्याप्रकरणी भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली याच्यावर एका कसोटी सामन्याची तसंच दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली. चेंडू स्वच्छ करण्याआधी पंचांना कल्पना न दिल्यामुळे सचिन तेंडुलकरवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. अतिरिक्त अपील केल्याप्रकरणी वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, शिव सुंदर दास आणि दीप दासगुप्ता यांच्यावर एकेक कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली.

शॉन पोलॉक आणि नॅन्टी हेवर्ड्स यांनीही अतिरिक्त अपील केलं होतं मात्र डेनिस यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही असा आरोप भारतीय पत्रकारांनी केला. भारतात डेनिस यांचे पुतळे जाळण्यात आले. संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. डेनिस यांनी केलेली कारवाई आकसातून आहे आणि ते .. आहेत असा आरोप करण्यात आला.

बीसीसीआयने दौऱ्यातून माघार घेण्याचा इशारा दिला. आयसीसीने डेनिस यांच्या भूमिकेचं समर्थन केलं मात्र दक्षिण आफ्रिका बोर्डाने बीसीसीआयला पाठिंबा दिला. तिसऱ्या कसोटीला अधिकृत दर्जा देण्यात आला नाही. मैत्रीपूर्ण पाचदिवसीय सामना असं याचं वर्णन करण्यात आलं. आकडेवारीसाठी तीन कसोटी झाल्या मात्र अधिकृत पातळीवर ही दोन कसोटी सामन्यांची मालिका म्हणून ग्राह्य धरण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका १-० अशी जिंकली.

सेंच्युरियन कसोटीत काय झालं?

कर्णधार सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि अजित आगरकर हे या कसोटीत खेळले नाहीत. अधिकृत नसलेल्या या कसोटीसाठी भारतीय संघाने कॉनर विलियम्स, वेंकटेश प्रसाद आणि नेहराला संधी दिली. कॉनर विलियम्सचा हा पहिलाच सामना होता. दुर्देवाने तो अखेरचाही ठरला. प्रसाद आणि नेहरा आधी कसोटी खेळले होते. अनधिकृत कसोटीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३२ धावांची मजल मारली. सलामीला आलेल्या कॉनर विलियम्सने ५ धावा केल्या. शिव सुंदर दासने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने प्रत्युत्तरादाखल खेळताना ५६६ धावांचा डोंगर उभारला. जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉकने शतकी खेळी साकारल्या. गॅरी कर्स्टनने ९० तर हर्षेल गिब्जने ५९ धावांची खेळी करत त्यांना चांगली साथ दिली. भारतीय संघाचा दुसरा डाव २६१ धावांतच आटोपला. कॉनरने ८३ चेंडूत ७ चौकारांसह ४२ धावांची संयमी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ७३ धावांनी सामना जिंकला.

या कसोटीला अधिकृत दर्जा मिळाला असता तर कॉनर भारतासाठी कसोटी खेळणारा २४०वा खेळाडू ठरला असता. मात्र तसं झालं नाही. आणखी काही महिन्यांनंतर संजय बांगरने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं आणि तो २४०वा भारतीय कसोटीपटू ठरला. याच मालिकेतल्या ब्लूमफौंटन इथे झालेल्या कसोटीत वीरेंद्र सेहवागने कसोटी पदार्पण केलं. तो भारतासाठी खेळणारा १३९वा कसोटी क्रिकेटपटू झाला. मात्र कॉनरच्या नशिबात हे नव्हतं.

भारतासाठी खेळूनही भारतासाठी खेळल्याची नोंद न झाल्याचा सल कॉनर यांच्या मनात नाही. ‘भारतासाठी खेळणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान होता.संघात निवड होणं हीच मोठी गोष्ट आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच सगळ्यांना माहिती होतं की या कसोटीला अधिकृत दर्जा नाही. मला क्रमांक असलेली कॅप देण्यात आली नाही. पण मी देशासाठी खेळू शकलो याचा मला आनंद आहे’, असं कॉनर यांनी सांगितलं.

‘दक्षिण आफ्रिकेच्या संघात शॉन पोलॉक, मखाया एनटिनी, नॅन्टी हेवर्ड्स, जॅक कॅलिस, लान्स क्लुसनर यांचा समावेश होता. मी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत खेळत होतो. भारतातल्या खेळपट्ट्या आणि तिथल्या खेळपट्ट्या यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सेंच्युरिनच्या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत होती. त्यांचं आक्रमण दर्जेदार होतं. सराव सामने पावसामुळे होऊ शकले नव्हते. ते सामने झाले असते तर मला खेळपट्टीशी जुळवून घ्यायला मदत झाली असती’, असं कॉनर यांनी सांगितलं.

‘मनात कोणताही सल नाही’

‘पहिल्या डावात मी अक्रॉस खेळण्याची चूक केली. त्यानंतर सचिनने मला सरळ बॅटने खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दुसऱ्या डावात चांगला खेळू शकलो. माझ्या मनात कटूता, सल किंवा पश्चाताप नाही. क्रिकेट हे माझं काम आहे. माझ्यापेक्षा जास्त चांगलं खेळणारे खेळाडू होते हे मान्य करायलाच हवं’, असं कॉनर यांनी काही वर्षांपूर्वी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं होतं.

त्याचवर्षी मायदेशात झालेल्या इंग्लंड दौऱ्यासाठी कॉनरची संघात निवड झाली होती मात्र अंतिम अकरात त्याला संधी मिळाली नाही. भारतासाठी पदार्पण हुकलं तरी याचा सल मनात न ठेवता कॉनरने बडोद्यासाठी सातत्याने धावांची टांकसाळ उघडली. कॉनरने १२४ प्रथम श्रेणी सामन्यात ७९४२ धावा केल्या. यामध्ये १९ शतकांचा समावेश आहे. २०००-०१ मध्ये बडोद्याने रणजी करंडकावर नाव कोरलं. त्या संघाचा कॉनर अविभाज्य भाग होता. त्यानंतर झालेल्या इराणी चषक कॉनरने शतकी खेळी साकारली. यामुळेच त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली होती. निवृत्तीनंतर कॉनरने नॅशनल ज्युनियर समितीचा चेअरमन म्हणून काम पाहिलं.

पुढे काय झालं?

आयसीसीने तेंडुलकर आणि गांगुली यांच्यावरील एका सामन्याची बंदी हटवली. पंचांना कल्पना न देता चेंडू साफ करणे ही चूक आहे पण चेंडू कुरतडण्याएवढा मोठी नाही असं आयसीसीने नमूद केलं. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. त्या मालिकेसाठी सेहवागची निवड करण्यात आली होती. सेहवागची संघात निवड करण्यात आली तर त्या कसोटीचा अधिकृत दर्जा काढून घेण्यात येईल असं आयसीसीने स्पष्ट केलं. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने परस्पर चर्चेअंती सेहवागला पहिल्या कसोटीतून वगळण्याचा निर्णय घेतला.