ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-१२ फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या भारताकडून तमाम देशवासीयांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र तसे न झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसऱ्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेता कपिल देव यांनी काही कारणांकडे लक्ष वेधले ज्यामुळे भारताचा पराभव झाला. कपिल देव यांना वाटते की बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटने नंतरच्या गोष्टींवर सोडून देण्याऐवजी पुढील विश्वचषकासाठी त्वरित नियोजन केले पाहिजे. २०२२ मध्ये पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आयसीसीच्या आठ स्पर्धांमध्ये असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

“आता भविष्यातील सामन्यांकडे पाहण्याची वेळ आली आहे. तुम्ही ताबडतोब नियोजन सुरू केले पाहिजे. विश्वचषक संपल्यापासून भारतीय संघाचे संपूर्ण क्रिकेट संपले आहे असे नाही. जा आणि योजना करा मला वाटतं आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये काही अंतर असायला हवे होते. पण हे निश्चित आहे की आज आमच्या खेळाडूंकडे भरपूर एक्सपोजर आहे पण ते त्याचा पुरेपूर उपयोग करू शकले नाहीत, ” अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना दिली.

कपिल देव यांनी काही क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग खेळणे पसंत करतात आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याला महत्त्व देत नाहीत, असे मोठे विधान केले आणि बीसीसीआयने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान कपिल देव यांनी आग्रह धरला की ते क्रिकेटपटूंनी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याच्या कल्पनेच्या विरोधात नाही, पण क्रम उलट असावा.

“जेव्हा खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात, तेव्हा आपण काय म्हणू शकतो. खेळाडूंना त्यांच्या देशासाठी खेळण्याचा अभिमान वाटला पाहिजे. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत नाही त्यामुळे जास्त काही सांगता येत नाही. पण मला वाटतं आधी देशाचा संघ आणि नंतर फ्रँचायझी असावं. मी असे म्हणत नाही आहे की तिथे क्रिकेट खेळू नका (फ्राँचायझीसाठी), पण त्यांच्या क्रिकेटचे चांगले नियोजन करण्याची जबाबदारी आता बीसीसीआयवर आहे. या स्पर्धेतील आमच्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे आम्ही केलेल्या चुका पुन्हा न करणे हा आहे, असे कपिल देव यांनी म्हटले.