शुक्रवारी मिचेल मार्शच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर लखनौ संघाने चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला. लखनौचं बाद फेरीत जाण्याचं स्वप्न संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी हा विजय सांत्वनपर होता. या विजयानंतर सोशल मीडियावर मिचेल मार्शसंदर्भात एक मीम व्हायरल झालं. २०१० मध्ये आयपीएल खेळणाऱ्या मिचेल मार्शचा तो फोटो होता. तब्बल १६ वर्षांपूर्वीच्या त्या फोटोने नव्या चाहत्यांना धक्का दिसला. स्टोन एज काळात मिचेल मार्श खेळत होता आणि आताही खेळतोय याचं चाहत्यांना आश्चर्य वाटलं.

आयपीएलचे सगळेच्या सगळे म्हणजे १९ हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये मार्शचा समावेश नाही. पण मार्शला आयपीएल पदार्पण करून १६ वर्ष झाली आहेत. U18 संघाचा कर्णधार म्हणून आलेला मार्श आता पस्तिशीच्या उंबरठ्यावर आहे. १६ वर्षात मार्श दुखापतीमुळे अनेक हंगाम खेळू शकला नाही. त्याने ६ संघांचं प्रतिनिधित्व केलं. इतकी वर्ष आयपीएलचा भाग असूनही एकदाही जेतेपद नशिबी नाही. दुखापतींमुळे मार्श हंगामातील सगळे सामने खेळू शकलेला नाही. यंदा लखनौचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र प्राथमिक फेरीचे सगळे सामने मार्श खेळेल अशी आशा आहे. यंदाच्या हंगामात मार्शने ४६७ धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. तडाखेबंद फटकेबाजी करणारा फलंदाज, भागीदारी फोडण्यात माहीर चतुर गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक अशी मार्शची ओळख आहे पण दुखापतीमुळे त्याच्या गोलंदाजीवर मर्यादा आल्या. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमानंतर मार्श विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळतो.

२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या U19 संघाचा कर्णधार असलेल्या मिचेल मार्शला डेक्कन चार्जर्स संघाने घेतलं. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट डेक्कन चार्जर्स संघाचा कर्णधार होता. ८ एप्रिल २०१० रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या लढतीत मार्शने पदार्पण केलं. सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस मिचेल मार्शची पहिली विकेट होता. फलंदाजीची वेळच आली नाही. त्या हंगामात मार्शला केवळ तीन सामन्यात संधी मिळाली, त्याने २८ धावा केल्या. २०११ लिलावात मार्श पुणे वॉरियर्स संघाकडून खेळला. २०११ आणि २०१३ मध्ये मार्श पुणेकर होता. २०१२ मध्ये पाठीचं दुखणं बळावल्यामुळे त्याला खेळता आलं नाही.

२०१४ ते २०२१ या कालावधीत मार्श केवळ दोनच हंगाम आयपीएलचा भाग होऊ शकला. तो सातत्याने दुखापतींच्या ससेमिऱ्यात होता. त्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी खेळायला सुरुवात केली. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघासाठी तो मोजून तीन सामने खेळला. २०२० मध्ये मार्श सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. मात्र पहिल्याच सामन्यात गोलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाला. दुखापत गंभीर असल्याने उर्वरित हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

२०२२ लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ६.५ कोटी रुपये खर्चून मार्शला ताफ्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव पदरी असलेल्या मार्शने २०२२ हंगामात २५१ धावा केल्या. २०२४ हंगामात मार्श दुखापतीतून सावरण्यासाठी मध्यातूनच परतला. लखनौ संघाने ३.४० कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केलं होतं. फिट मार्शने गेल्या वर्षी १३ सामन्यात १६३च्या स्ट्राईकरेटने ६२७ धावा चोपून काढल्या. यादरम्यान त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. मिचेलचा भाऊ शॉन मार्शने अनेक वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये शतक झळकावलं होतं. आयपीएलमध्ये शतक झळकावणारी भावांची ही पहिलीच जोडी ठरली.

मार्शने आयपीएल स्पर्धेत ६७ सामन्यात १४७च्या स्ट्राईकरेटने १७५९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. आता गोलंदाजी करत नसला तरी मार्शच्या नावावर या स्पर्धेत ३७ विकेट्स आहेत.