Playoffs Scenario For Chennai Super Kings: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२६ स्पर्धेत सूर गवसलेला नाही. स्पर्धेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला सहाव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. दरम्यान कसं असेल समीकरण? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेत सर्व संघांना प्रत्येकी १४-१४ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आतापर्यंत ३ सामने खेळून झाले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अजूनही ११ सामने शिल्लक आहेत. जर हे ११ सामने जिंकले, तर चेन्नईचा संघ २२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. पण लागोपाठ ११ सामने जिंकणं अशक्य तर नाही, पण कठीण नक्कीच आहे.
कमीत कमी किती सामने जिंकावे लागतील?
सुरुवातीचे ३ सामने गमावले म्हणून चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार, असं मुळीच नाही. कारण शेवटच्या सामन्यानंतर कोणते ४ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार हे निश्चित नसतं. त्यामुळे चेन्नईला प्लेऑफमध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करायचा असेल, तर कमीत कमी ८-९ सामने तरी जिंकावे लागतील. असं झाल्यास चेन्नईचा संघ १६ ते १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. हे गुण प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यासाठी पुरेसे आहेत. पण जर याहून कमी सामने जिंकले तर, प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने जर ७ किंवा ८ सामने जिंकले, तर समीकरण हे नेट रनरेटवर अवलंबून असेल. सुरवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नईला हवा तसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे नेट रनरेट हा निगेटिव्हमध्ये आहे. तो पॉझिटिव्ह करण्याचं आव्हान चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर असणार आहे. जर चेन्नईला गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचं असेल, तर हे चेन्नईसमोरील सर्वात मोठं आव्हान असेल. कारण त्यासाठी चेन्नईला सर्व शिल्लक ११ सामने जिंकावे लागतील.
