नुकत्याच स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान निर्भीडपणा दाखवणाऱ्या बॉक्सिंगपटू लोव्हलिना बोरगाईनचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी या स्पर्धेत पदकविजेत्या खेळाडूंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लोव्हलिनाचं कौतुक केलं.
‘त्या रेस्टारंटमध्ये नक्की काय झालं? आपला नकाशा चुकीचा आहे हे तू निर्भीडपणे सांगितलंस’, असं पंतप्रधान लोव्हलिनाला म्हणाले. लोव्हलिनाने ७५ किलो वजनी गटात रौप्यपदकावर नाव कोरले.
लोव्हलिनाने हसून प्रतिसाद दिला. ती म्हणाली, ‘आम्ही विजयाचा आनंद साजरा करत होतो. त्यावेळी आम्हाला हा नकाशा दिसला. ते पाहून कसंतरीच वाटलं. मी नम्रपणे त्या रेस्टॉरंटच्या मालकांना याबाबत सांगितलं. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून तातडीने बदल करू असं आश्वासन दिलं’.
‘तू देशाचा विचार केला. विजयाचा आनंद साजरा करून तू जाऊ शकली असती पण तू देशाच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतलीस. नकाशा योग्य नाही हे तुझ्या लक्षात आलं, ते मांडण्याचं धारिष्ट्य तू दाखवलंस. पदक जिंकण्याइतकंच हे महत्त्वाचं आहे’, असं पंतप्रधान म्हणाले.
बॉक्सिंगपटूंनी ग्लासगो इथे झालेल्या स्पर्धेत १० पदकांची कमाई केली. या घवघवीत यशानंतर बॉक्सिंगपटू विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जमले होते. त्यावेळी तिथे भारताचा नकाशा होता. त्या नकाशात ईशान्य भारत वगळण्यात आला होता.
त्यावेळी लोव्हलिनाने रेस्टॉरंट मालकाला सांगितलं, ‘या नकाशाने मी दुखावली आहे. भारताच्या नकाशात ईशान्य भारत नाहीये. बाहेर जो नकाशा आहे त्यातही ईशान्य भारत दाखवण्यात आलेला नाही. ईशान्येकडची सातही राज्यं भारताचा अविभाज्य भाग आहे. मी ईशान्य भारतात राहते. हे पाहून मला अतिशय वाईट वाटलं. जेव्हाही तुम्ही भारताचा नकाशा दाखवता तो योग्यच असायला हवा. नसेल तर तो नकाशा लावू नका’.
रेस्टॉरंट मालकांनी गांभीर्याने याप्रकरणाची दखल घेत तातडीने माफी मागितली. ‘अचूक नकाशासह आम्ही लोगो लावू. कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकविजेत्या बॉक्सिंगपटूंचं आम्ही आदरातिथ्य करू शकलो ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्या खेळाडूंनी आमच्या इथल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. आमच्यासाठी ही आठवण चिरंतन स्मरणात राहील’, असं रेस्टॉरंटचे मालक मिस्टर सिंग यांनी सांगितलं.
ग्लासगोतल्या भारतीय दूतावासाने याप्रकरणाची दखल घेत असून त्यांनी संबंधित रेस्टॉरंटशी संपर्क साधला आहे.
