नवी दिल्ली : भारतीय जगात कुठेही गेले, तरी ते त्यांच्या मुळाशी जोडलेले राहतात. ते ज्या ठिकाणी राहतात, काम करतात त्या ठिकाणाच्या विकासात योगदान देतात. हे भारतीयत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आज ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळणारे ‘भारतीय’ त्यांच्या देशांसाठी अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी रविवारी

‘मन की बात’ या कार्यक्रमातील भाषणातून विविध संघांकडून खेळणार्‍या भारतीय वंशाच्या खेळाडूचे कौतुक केले.

‘‘खेळ आपल्याला एकत्र आणतात. तुम्ही सध्या सुरू असलेली ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बघत असाल. अनेक वेळा तुमची नजर एखाद्या विशिष्ट खेळाडूवर खिळली असेल. त्याची जर्सी जरुर दुसर्‍या देशाची असेल, पण नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटते की ही व्यक्ती आपल्या देशातील आहे. मग हृदयाच्या कोपर्‍यात थोडा आनंद निर्माण होतो,’’ असे मोदी म्हणाले.

‘‘या भारतीय वंशाच्या खेळाडूंचे कुटुंब परदेशात स्थायिक झाले आहे. त्यामुळे ते तेथून खेळतात. मनापासून त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व करतात. यात सर्वाधिक खेळाडू कॅनडा संघात आहेत. कर्णधार दिलप्रीत बाजवा यांचा जन्म पंजाबमधील गुरदासपूरचा, नवनीत धालीवाल चंडीगडचे. हर्ष ठाकर, श्रेयस मोवा अशी अनेक नावे केवळ कॅनडाचाच नाही, तर भारताचाही अभिमान वाढवत आहेत,’’ असे मोदी म्हणाले. ‘‘अमेरिकन संघाचा कर्णधार मोनांक पटेल गुजरातकडून वयोगट क्रिकेट खेळला आहे.

मुंबईचा सौरभ नेत्रावळकर, हरमीत सिंग, दिल्लीचा मिलिंद कुमार हे सर्व भारतीय खेळाडू अमेरिका संघाचा अभिमान आहेत. जतिंदर सिंग, विनायक शुक्ला, करण, जय आणि आशीष हे भारतीय म्हणजे ओमान क्रिकेटला बांधणारे मजबूत दुवे आहेत. इतकेच नाही तर न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती आणि इटली संघातही भारतीय खेळाडू दिसतात. ही भारतासाठीही अभिमानाची बाब आहे,’’ असेही मोदी यांनी नमूद केले.