PM Narendra Modi CWG 2026 medalist Narendra Berwal funny story: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील त्यांच्या ‘७ लोक कल्याण मार्ग’ येथील निवासस्थानी, २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं कौतुक केलं. शिवाय खेळाडूंशी संवादादरम्यान त्यांना काही प्रश्न विचारले. त्यापैकी भारताचा रौप्य पदक विजेता कुस्तीपटू नरेंद्र बेरवाल याने एक किस्सा सांगितला. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
या संवादादरम्यान, पुरुषांच्या ९० किलोहून अधिक वजनी गटात रौप्ट पदक पटकावणाऱ्या बॉक्सर नरेंद्र बेरवालने एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द पंतप्रधान मोदीही खळखळून हसले. बेरवालने सांगितलं की, सामन्यानंतर पाकिस्तानी बॉक्सरने त्याच्याशी संवाद साधला होता. त्यांनी तो प्रसंग इतक्या रंगतदार पद्धतीने सांगितला की उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि स्वतः पंतप्रधान मोदीही हसू लागले.
बेरवाल याने २०१५च्या मिलिटरी गेम्समधील हा प्रसंग सांगितला. मिलिटरी गेम्समध्ये पहिल्याच फेरीत त्याचा सामना पाकिस्तानच्या बॉक्सरशी झाला होता आणि त्याआधी सैन्यातील सहकाऱ्यांकडून त्याला स्पष्ट संदेश मिळाला होता की हा सामना कोणत्याही परिस्थितीत गमावायचा नाही. तो म्हणाला, “माझा पहिल्या फेरीचा सामना पाकिस्तानविरुद्ध होता. मला सैन्याकडून फोन आला आणि सांगण्यात आलं की पाकिस्तानी खेळाडूकडून सामना गमावायचा नाही. मी तो सामना जिंकलो, पण दोघांनाही जखमा झाल्या. मी पहिला राऊंड ४-१ ने जिंकलो तर दुसरा राऊंड ३-२ने जिंकलो, पण सामन्यादरम्यान आमचं डोक एकमेकांवर आपटलं आणि टाके घालण्यासाठी रुग्णालयात जावं लागलं.”
सामन्यानंतर दोन्ही बॉक्सर रुग्णालयात असताना एक मजेशीर योगायोग समोर आला. बेरवालने सांगितलं की त्या स्पर्धेत त्याचे आर्मी प्रशिक्षक यांचं नावही नरेंद्र होतं. तेव्हा पाकिस्तानी बॉक्सरने त्यांना हसत म्हणालं, “तुझं नाव नरेंद्र, तुझ्या कोचचं नाव नरेंद्र आणि तुमच्या पंतप्रधानांचं नावही नरेंद्र… मला ‘नरेंद्र’ नावाचाच तिरस्कार वाटायला लागला आहे!”
हा किस्सा सांगताना बेरवाल यांनी पाकिस्तानी बॉक्सरची अॅक्शन करत रंगवून सांगितला. ते ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित सर्वजण मोठ्याने हसू लागले. हा प्रसंग ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समधील भारताच्या विक्रमी बॉक्सिंग मोहिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात घडला. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॉक्सर पथकाने ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.
