पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयच्या सत्तेला आव्हान दिल्याने येणाऱ्या काळात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी क्रिकेट याबाबत बोलताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रमीझ राजा म्हणाले, “पाकिस्तान बोर्डाला आयसीसीकडून ५०% निधी मिळतो. आयसीसी स्पर्धा आयोजित करते आणि नफा त्यांच्या बोर्ड सदस्यांमध्ये वितरित करते. आयसीसीचा ९०% निधी हा भारतीय क्रिकेट बाजारपेठेतून येतो. म्हणजे एक प्रकारे, भारतीय व्यावसायिक पाकिस्तान क्रिकेट चालवत आहेत. जर उद्या भारतीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला की आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही, तर हे क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल. बीसीसीआयवरील आपले अवलंबून राहणे दरवर्षी १०% कमी झाले पाहिजे,” असे रमीझ राजा म्हणाले.
बांगलादेशने टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतली. याला पाठिंबा म्हणून पाकिस्तानही स्पर्धेवर बहिष्कार घालणार होतं. मात्र आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्यांनी विचार बदलला. पाकिस्तानचा संघ टी२० वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे मात्र भारताविरुद्धच्या लढतीवर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आयसीसी पाकिस्तानवर काय कारवाई करणारे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी विदेशी खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र मिळणं कठीण होऊ शकतं. याव्यतिरिक्त भविष्यात पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचं आयोजन मिळण्याची शक्यताही धूसर होईल.
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यांच्याकडून जेतेपेदाचा करंडक स्वीकारण्यासही भारताने नकार दिला होता. नक्वी करंडकासह निघून गेले. भारतीय संघ जेतेपदाच्या करंडकाविना मायदेशी परतला. अजूनही तो करंडक भारतीय संघाला मिळालेला नाही. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या त्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. पण अंतिम सामन्यात नक्वींशी हस्तांदोलन न करणे भारतालाच महागात पडले.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक कमाई करून देणारा कोणता सामना असेल, तर तो भारत – पाकिस्तान सामना आहे. या सामन्यातून आयसीसीला २५ करोड डॉलर म्हणजेच २२०० कोटी रुपयांहून अधिकची रक्कम. त्यामुळे जर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला, तर मोठं नुकसान होऊ शकतं.भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आधी द्विपक्षीय मालिकांमध्ये देखील आमनेसामने येत होते. पण दोन्ही देशातील सीमांतर्गत वादांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात.
याआधी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने, दोन्ही देशातील सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
जर हा सामना रद्द झाला, तर ब्रॉडकास्टर्सचं खूप मोठं नुकसान होणार आहे. या स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग राईट्स जियो हॉटस्टारकडे आहेत. त्यामुळे जियो हॉटस्टारचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर पाकिस्तानचा संघ आपल्या निर्णयावर अडून राहिला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं कोटींचं नुकसान होऊ शकतं. माध्यमातील वृत्तानुसार, सामना रद्द झाल्यास जाहिरातीमुळे होणारं नुकसान हे २०० ते २५० कोटींच्या घरात असणार आहे. या मोठ्या सामन्यादरम्यान १० सेकंदाच्या जाहिरातीची किंमत ४० लाख रूपये इतकी असते. हा सामना न खेळणं पाकिस्तानला महागात पडू शकतं. एका सामन्यासाठी होणारा खर्च हा २२०० कोटींहून अधिक आहे. तर पाकिस्तानची वर्षाची कमाई ३.५५ कोटी डॉलर इतकी आहे. त्यामुळे सामना रद्द करणं हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला परवडणारं नाही.

