चेन्नई : भारतातील बुद्धिबळ  महोत्सवाला प्रारंभ झाला असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या मान्यवरांच्या उपस्थित बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

‘‘बुद्धिबळ या खेळाला ज्या भूमीत सुरुवात झाली, तिथे प्रथमच ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून त्याच वर्षी ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवणे, हे भारतासाठी खास यश आहे,’’ असे पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळय़ातील भाषणात म्हणाले.

उद्घाटन सोहळय़ात भारत आणि तमिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. तसेच भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ऑलिम्पियाड क्रीडाज्योत स्टॅलिन आणि मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश युवा ग्रँडमास्टरांसह भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर एस. विजयालक्ष्मी यांनी ही क्रीडाज्योत हाती घेतली.

‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वार्कोव्हिच उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी तमिळनाडू सरकारचे आभार मानले. ‘‘ऑलिम्पियाड ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून एक उत्सव आहे. या स्पर्धेमुळे सर्वत्र सकारात्मक वातावरण होते,’’ असेही द्वार्कोव्हिच म्हणाले. या सोहळय़ाला प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हेसुद्धा उपस्थित होते.

आज पहिली फेरी

चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे होत असलेल्या ऑलिम्पियाडच्या ११ पैकी पहिल्या फेरीचे सामने शुक्रवारी खेळवले जातील. अग्रमानांकित भारताचा महिला ‘अ’ संघ पहिल्या फेरीत काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणार आहे. 

पाकिस्तानची माघार; भारताची टीका

नवी दिल्ली : तमिळनाडू येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतून माघार घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीका केली आहे. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे होत असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर ‘राजकारण’ मध्ये आणत पाकिस्तानने या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेतून माघारी घेणे हे आश्चर्यकारक आणि दुर्दैवी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. ऑलिम्पियाडची क्रीडा ज्योत काश्मीरमध्येही नेण्यात आल्यामुळे पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली.