नवी दिल्ली : तुम्ही भारतासाठी पदके जिंकता आणि प्रत्येक वेळी नवी उंची गाठता. शाळांमधून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यापेक्षा तुमचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे आहेत. तुमच्या प्रयत्नांतून मिळणारी पदके मुलांना आणि युवकांना अधिक प्रेरणा देतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल पदकविजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

मोदी यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल पदकविजेत्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंची विचारपूस करत त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यावेळी उपस्थित होत्या. या भेटीने भारावून गेल्याची भावना खेळाडूंनीही व्यक्त केली.

बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनने ग्लासगो येथील भारताच्या छेडछाड केलेल्या नकाशावरून घेतलेला आक्षेप, तसेच बॉक्सिंगपटू जादुमणी सिंहने कारगिल विजय दिवसाची आठवण ठेवत केलेल्या कृतीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणार्‍या वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूशीही संवाद साधताना मोदी यांनी तिचा गौरव केला.

पदक स्वीकारताना डोळ्यांत आलेल्या अश्रूंबाबत मीराबाईला मोदी यांनी विचारले. ‘‘तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये माझे पदक अवघ्या एका किलोने हुकल्यामुळे मी रडले होते. गेल्या चार वर्षांत मी दुखापती आणि काही कौटुंबिक समस्यांचा सामना केला. ही चार वर्षे माझ्यासाठी अत्यंत कठीण होती. त्यामुळे जेव्हा मी विजयमंचावर उभी राहिले आणि राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा मला माझे अश्रू आवरता आले नाहीत,’’ असे मीराबाईने सांगितले.

‘‘मी या घरात गेल्या १२-१३ वर्षांपासून आहे. मात्र, मी इथे नियमितपणे भेटत असलेला एकमेव गट म्हणजे खेळाडूंचा. तुम्ही भारतासाठी पदके जिंकता आणि प्रत्येक वेळी नवी उंची गाठता. शाळांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तुमची पदके लोकांना त्यापेक्षा अधिक प्रेरणा देतात,’’ अशा शब्दांत मोदी यांनी खेळाडूंची पाठ थोपटली.

लवलिनाचे कौतुक

बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनशी संवाद साधताना मोदी यांनी, ‘तू तिथे हॉटेलवाल्याशी भांडत होतीस का?’ असा मिश्कील प्रश्न विचारला. भारताच्या यशाचा आनंद साजरा करताना हॉटेलमध्ये लावलेला भारताचा नकाशा चुकीचा असल्याचे माझ्या लक्षात आले. मी हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यांनी तातडीने नकाशात बदल केला, असे लवलिनाने सांगितले. विजयाचा आनंद साजरा करत असतानाही भारताचा स्वाभिमान जपल्याबद्दल मोदी यांनी लवलिनाचे कौतुक केले.

नावातील मजा…

भारताचा ९० किलो वजनी गटातील बॉक्सिंगपटू नरेंदर बेरवालने आपल्या नावाचा एक मजेशीर किस्साही मोदी यांना सांगितला. काही वर्षांपूर्वी एका लढतीत त्याने पाकिस्तानी प्रतिस्पध्र्यावर विजय मिळवला. या लढतीनंतर वैद्यकीय कक्षात उपचार घेत असताना पाकिस्तानी बॉक्सिंगपटू नरेंदरला गमतीत म्हणाला की, ‘‘भाईजान, तुमचे नाव नरेंदर आहे, तुमच्या प्रशिक्षकाचे नाव नरेंदर आहे आणि तुमच्या पंतप्रधानांचे नाव नरेंद्र आहे. मला आता या नावाचाच तिरस्कार वाटू लागला आहे.’’ नरेंदरने सांगितलेला हा किस्सा ऐकून पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरले नाही.