भारताने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ आज सकाळी (४ जुलै) दिल्लीत दाखल झाला. टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेतील विजयानंतर भारतीय संघाचे आज दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी दिल्ली विमानतळावर क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. जवळपास एक ते दीड तास पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाबरोबर संवाद साधला आहे. भारतीय संघाने २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. तब्बल १७ वर्षांनंतर भारताने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आता भारतीय संघ भारतात दाखल झाल्यानंतर आधी दिल्लीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला होता. जगज्जेत्या संघाकडून दिल्लीत हा केक कापण्यात आला. हेही वाचा : मुंबईकर खेळाडूंचा विधीमंडळात होणार सत्कार; रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबेला निमंत्रण भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर जवळपास मोदींनी जवळपास दीड तास संवाद साधल्यानंतर भारतीय संघ मुंबईकडे रवाना झाला. आता टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मुंबईतील विजय परेडसाठी विशेष बस मुंबईतील विजय परेडसाठी बीसीसीआयने एक विशेष बस तयार केली आहे. बसच्या बाजूला टीम इंडियाचे ट्रॉफी घेऊन सेलिब्रेशन करतानाचे मोठे आणि विहंगम फोटो लावण्यात आले आहेत. बस वरून खुली आहे, तिच्यावर स्वार होऊन भारतीय खेळाडू सुमारे दीड किलोमीटरच्या रोड शोमध्ये भाग घेतील आणि संपूर्ण संघ बीसीसीआय कार्यालयात पोहोचेल. या बसचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत विजयी परेड भारतीय संघाची ही विजयी परेड नरिमन पॉइंट येथून सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनीही परेड मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होणार आहे. यामध्ये बीसीसीआय खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफचा सन्मान करण्यात येणार आहे.