आपल्या सक्षम नेतृत्वासह रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वचषक मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला पुन्हा विश्वचषक मिळवून देण्यासाठी माजी कर्णधार असलेल्या पॉन्टिंगने संभाव्य संघाची आखणी केली आणि यामध्ये भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर सिंग संधूचा समावेश केला आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जेसन बेरेनडॉरफ, गुरिंदर सिंग संधूसह फिरकीपटू अ‍ॅश्टॉन अगर यांच्या कामगिरीने पॉन्टिंग प्रभावित झाला आहे. बिग बॅश स्पर्धेत पर्थ स्क्रॉचर्सचे प्रतिनिधित्व करताना बेरेनडॉरफने चांगली कामगिरी केली आहे, तसेच प्रथमश्रेणी सामन्यातही त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय आहे. बेरेनडॉरफच्या बरोबरीने न्यू साऊथ वेल्स संघाच्या संधूने आपल्या कामगिरीने पॉन्टिंगचे मन जिंकले आहे. ‘अ’ श्रेणीच्या सामन्यात संधूने २४.३६च्या सरासरीने ५२ बळी घेतले आहेत. ट्वेन्टी-२० सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये संधूने टिच्चून गोलंदाजी करत फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले आहे. संधूची ही क्षमता एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी उपयुक्त ठरू शकते.
इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलेल्या फिरकीपटू अगरने पहिल्याच लढतीत ९८ धावांची शानदार खेळी केली होती. अगरला विशेषज्ञ फिरकीपटू म्हणून संघात समाविष्ट करावे असे वाटते, असे पॉन्टिंगने सांगितले. तो चांगला फिरकीपटू आहे आणि उत्तम क्षेत्ररक्षक आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेल निर्णायक ठरू शकतो असे त्याने पुढे सांगितले. जोरदार टोलेबाजी करण्याची क्षमता, उपयुक्त फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक ही मॅक्सवेलची ओळख आहे. मात्र त्याला कामगिरीत सातत्य आणावे लागेल असे पॉन्टिंगला वाटते.
दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठीच्या संभाव्य ३० खेळाडूंची यादी सादर केली आहे. मात्र खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.