मेलबर्न : राहुल द्रविडची नेमणूक होण्याआधी मुख्य प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला होता, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने दिली आहे.‘‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सुरू असताना भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासंदर्भात माझ्या काही व्यक्तींशी दोनदा बैठकी झाल्या. ज्या व्यक्तींशी माझी चर्चा झाली, ते माझ्याबाबत पूर्णत: अनुकूल होते,’’ असे पाँटिंग म्हणाला.

‘‘भारताचे प्रशिक्षकपद सांभाळण्यासाठी मला ‘आयपीएल’मधील प्रशिक्षकपद सोडावे लागणार होते. जे मला मान्य नव्हते. याच कारणास्तव मी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद नाकारले होते,’’ असे पाँटिंगने सांगितले.

‘‘मला सात वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे वर्षांतील ३०० दिवस प्रशिक्षकपदासाठी घरापासून दूर राहणे मला जमणार नव्हते. त्यामुळेच ‘आयपीएल’चे कार्य मला योग्य वाटते,’’ असे पाँटिंगने सांगितले.

द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पाँटिंगने आश्चर्य प्रकट केले. ‘‘द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदाबाबत समाधानी असल्याचे ऐकिवात होते. त्यामुळे तो प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार नाही, असे मला वाटत होते. परंतु भारताच्या प्रशिक्षकपदासाठी तोच योग्य व्यक्ती असल्याचे मी बऱ्याच जणांकडून ऐकले होते,’’ असे पाँटिंगने सांगितले. पुढील हंगामातही ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल्स संघाला मार्गदर्शन करणार असल्याचे पाँटिंगने म्हटले आहे.