क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष फ्रूडेन्स्टीन यांचे मत

महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश आणि छायाचित्र पाठवल्याप्रकरणाची तीन वर्षांपूर्वी चौकशी झाली, त्या वेळीच टिम पेनला ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून न काढणे ही चूक होती, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष रिचर्ड फ्रूडेन्स्टीन यांनी व्यक्त केले आहे.

३६ वर्षीय पेनने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. २०१८ मध्ये चेंडू फेरफार प्रकरणानंतर त्याला कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्याआधी २०१७ मध्ये त्याने महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवले होते.

‘‘२०१८ मध्ये या प्रकरणाची चौकशी झाली, तेव्हा पेनला कर्णधारपदी कायम राहू दिले. त्या वेळी मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा भाग नव्हतो. त्यामुळे मी त्या निर्णयाबाबत काहीही भाष्य करणे बहुधा योग्य नाही. मात्र, आता ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेपुढे जे पुरावे ठेवण्यात आले आहेत, त्यानुसार पेनला कर्णधारपदावरून न काढण्याचा निर्णय चुकीचा होता हे स्पष्ट आहे. त्याची वागणूक योग्य होती, असा चुकीचा संदेश त्या निर्णयामुळे दिला गेला,’’ असे फ्रूडेन्स्टीन म्हणाले.