Spain Beat Portugal ends FIFA World Cup 2026 Campgain: फिफा विश्वचषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी स्वप्नवत शेवट घडला नाही. स्पेनने अतिरिक्त वेळेत गोल करत पोर्तुगालला पराभवाचा दणका दिला आणि रोनाल्डोचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पोर्तुगालविरूद्ध स्पेनने एक्स्ट्रा टाईम गोल करत १-० असा थरारक विजय नोंदवला आहे. सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या मायकेल मरीनो याने हा ऐतिहासिक गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचं फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. या पराभवासह स्पेनचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोला या पराभवानंतर मैदानावर अश्रू अनावर झाले.
संपूर्ण सामन्यात स्पेनने अधिक आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या, मात्र पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाने एकापेक्षा एक सरस बचाव करत आपल्या संघाला शेवटपर्यंत सामन्यात टिकवून ठेवलं. सामन्याच्या अखेरच्या क्षणांत पोर्तुगालने बरोबरीचा गोल करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. अगदी गोलरक्षक डिओगो कोस्टाही आक्रमणासाठी स्पेनच्या पेनल्टी क्षेत्रात पोहोचला होता. मात्र, स्पेनच्या भक्कम बचावफळीने कोणतीही संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या पराभवासह ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विश्वचषक कारकिर्दीचा भावनिक शेवट झाला. दुसरीकडे, युवा स्टार लामिन यामालच्या स्पेनने पुढील फेरीत प्रवेश करत फुटबॉलमधील सर्वात मोठ्या किताबाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं.
लामिन यामालसाठीही पोर्तुगालविरुद्धच्या लढतीच्या काही कटू आठवणी होत्या. गेल्यावर्षी झालेल्या यूईएफए नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पोर्तुगालकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी यामाल आणि स्पेनसमोर होती. विशेष म्हणजे, विश्वचषकात २०१८ नंतर प्रथमच स्पेन आणि पोर्तुगाल आमनेसामने आले. रशियात झालेल्या त्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रिक करत स्पेनच्या हातातून सामना हिसकावून घेतला होता आणि अखेर तो सामना ३-३ असा बरोबरीत संपला होता.
आयबेरियन डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढतीकडे फुटबॉल चाहत्यांचं विशेष लक्ष होतं. दोन्ही संघांकडे जागतिक दर्जाचे अनेक स्टार खेळाडू असून विशेषतः मध्यफळीतील ताकद ही सामन्याचं मुख्य आकर्षण होती. पोर्तुगालकडे ब्रुनो फर्नांडिस, विटिन्हा आणि जोआओ नेव्हेस यांसारखे दमदार खेळाडू होते, तर स्पेनकडे पेद्री, रोड्री आणि दानी ओल्मो यांसारखी स्टार्सची फळी सज्ज होती. त्यामुळे या महासंग्रामाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्याचप्रमाणे अतिरिक्त वेळेत जात झालेल्या गोलमुळे हा सामना अधिक थरारक ठरला.
