कुवेत / बीजिंग : लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा हांगझो येथे पुढील वर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी घोषणा मंगळवारी आशियाई ऑलिम्पिक परिषदेने केली आहे.

आशियाई स्पर्धेचे १९वे पर्व १० ते २५ या सप्टेंबर या दरम्यान होणार होते. परंतु चीनमधील करोनाच्या साथीमुळे ६ मे रोजी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

‘‘कृती दलाकडून गेले दोन महिने चीन ऑलिम्पिक समिती, हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजन समिती आणि अन्य भागधारकांशी तारखांसदर्भात चर्चा सुरू होती. अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या कार्यक्रमपत्रिकांचा अंदाज घेऊनच कृती दलाने सुचवलेल्या तारखांना संयोजन समितीने मंजुरी दिली,’’ अशी माहिती चीन ऑलिम्पिक समितीने दिली.

भारतीय कुस्ती महासंघाची नाराजी

आशियाई स्पर्धेच्या तारखांबाबत भारतीय कुस्ती महासंघाने नाराजी प्रदर्शित केली आहे. कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रशियात १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. परंतु आशियाई स्पर्धेला २३ सप्टेंबरपासूनच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कुस्तीपटूंपुढे लागोपाठच्या स्पर्धाची आव्हाने असतील. भारतीय कुस्तीपटूंना रशियातून थेट चीनला रवाना व्हावे लागणार आहे. जागतिक स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा लाभला आहे.