टेनिसमध्येच कारकीर्द घडवण्याच्या जिद्दीने झपाटलेल्या प्रार्थना ठोंबरे या युवा खेळाडूने सोलापूर येथील एका गोदामातील सराव ते कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक असा प्रवास केला आहे तो कमालीच्या जिद्दीनेच.
वीस वर्षीय प्रार्थनाने भारताची अव्वल दर्जाची खेळाडू सानिया मिर्झा हिच्या साथीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत त्यांना चीन तैपेईच्या खेळाडूंविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. बार्शी येथील रहिवासी असलेल्या या खेळाडूने व तिच्या पालकांनी अनेक अडचणींवर मात केली, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भवितव्य लाभलेली खेळाडू म्हणून प्रार्थनाकडे पाहिले जात आहे.
तिच्या या संघर्षपूर्ण प्रवासाबाबत तिचे वडील गुलाबराव म्हणाले, आमची मुलगी कधी टेनिसमध्ये कारकीर्द करील असे आमच्या स्वप्नातही नव्हते. तिने तबला शिकावा म्हणून आम्ही तिला लहानपणी एका शिक्षिकेकडे पाठविले, मात्र त्यामध्ये तिला रुची नव्हती. तिला उडय़ा मारण्याची खूप सवय होती. शासकीय अस्थापनात अभियंता म्हणून मी काम करीत होतो. प्रार्थनाला टेनिसची आवड होती. टेनिसचे प्रशिक्षण मिळावे यासाठी मी सोलापूरला बदली घेतली. दररोज मी सकाळी तिला घेऊन बार्शीहून सोलापूर येथे येत असे. तेथे तीन-चार तास सराव ती करीत असे. माझे कार्यालयातील काम संपेपर्यंत ती एका फॅक्टरीच्या आवारात झाडाखाली विश्रांती घेत असे. तेथील रिकाम्या गोदामात मी दोन बाजूंना मोठय़ा काठय़ा ठोकून त्याला दोरी बांधून सरावाची सुविधा तयार केली होती. खऱ्या अर्थाने तिची टेनिस कारकीर्द केव्हा सुरू झाली, असे विचारले असता गुलाबराव म्हणाले, दहाव्या वर्षी तिने शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रास सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. तेथूनच तिची टेनिसमधील समर्थ वाटचाल सुरू झाली. १४ व १६ वर्षांखालील गटात तिने आशियाई स्तरावरील मानांकनात सर्वोच्च स्थानही मिळविले आहे.
टेनिसमधील मानांकनात प्रगती करण्यासाठी प्रार्थना हिला अनेक वेळा परप्रांतात आणि परदेशातही प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी तिच्यासोबत तिची आई वर्षां यांना जावे लागते तर काही वेळा गुलाबराव यांना जावे लागते. काही वेळा रजा मिळताना खूप अडचणी येत आहेत हे लक्षात घेऊन गुलाबराव यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली व पूर्णपणे प्रार्थना हिच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे.