IPL 2026 Praful Hinge Creates History: आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वात खतरनाक स्पेल सनरायझर्स हैदराबादचा पदार्पणवीर खेळाडू प्रफुल हिंगेने टाकला आहे. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या षटकात प्रफुल हिंगेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात प्रफुल हिंगेने अशी कामगिरी केली आहे, जी वर्षानुवर्षे सर्वांच्या लक्षात राहणारी आहे. आपल्या आयपीएल पदार्पणात अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
२४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं. आपल्या आयपीएल पदार्पणातच प्रफुलने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेत तिन्ही फलंदाजांना शून्यावर माघारी धाडलं. वैभव सूर्यवंशीला गोल्डन डकवर बाद करत या विकेटचा सिलसिला घेण्यास सुरूवात केली आणि पहिल्याच षटकात राजस्थानच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं.
प्रफुल हिंगेचा ड्रीम डेब्यू! पदार्पणाच्या सामन्यात इतिहास घडवला
हैदराबादकडून पहिलं षटक टाकणाऱ्या प्रफुलच्या पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या वैभवने षटकाच्या दुसऱ्या आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला, पण यावेळी चेंडू हवेत उंच उडाला आणि यष्टीरक्षकाने त्याचा झेल घेतला. हे सर्वांसाठी आश्चर्यकारक होते, कारण मागील चार सामन्यांमध्ये वैभवने जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर वादळी फटकेबाजी केली होती.
वैभव या सामन्यात मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर ध्रुव जुरेल आला, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. पण तोही त्याच षटकात प्रफुलच्या गोलंदाजीवर अवघ्या दोन चेंडूंवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला. खरा थरार तर अजून बाकी होता. आता पदार्पण करणारा १९ वर्षीय लुहान-ड्रे-प्रिटोरियस फलंदाजीला आला. पण त्याचीही तीच गत झाली आणि खातंही न उघडता अवघ्या दोन चेंडूंवर तोही बाद झाला.
यासह प्रफुल हिंगेने पहिल्या षटकात फक्त १ धाव देत ३ विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेणारा प्रफुल हिंगे हा स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला. १९ वर्षांच्या आयपीएल इतिहासात आजवर अशी कामगिरी कोणताच गोलंदाज करू शकला नव्हता. पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेऊन प्रफुल थांबला नाही. प्रफुल परत सामन्यातील तिसरं षटक टाकण्यासाठी आला आणि प्रफुलने राजस्थानचा कर्णधार रियान परागला झेलबाद केलं. कसोटी सामन्यामध्ये ज्याप्रमाणे फलंदाज स्लिपमध्ये बाद होतात, त्याचप्रमाणे रियान परागला त्याने झेलबाद केलं. यासह ३ षटकांत प्रफुलने १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
