Praful Hinge POTM Award and His Journey: प्रफुल हिंगेने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये स्वप्नवत पदार्पण केलं. प्रफुलने पदार्पणाच्या सामन्यातच खतरनाक स्पेल टाकत आपल्या गोलंदाजीचा प्रत्यय सर्वांना दिला. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुहान ड्रे प्रिटोरियस यांना शून्यावर बाद करून आयपीएलमध्ये इतिहास घडवला. याशिवाय त्याने राजस्थानचा कर्णधार रियान परागला आपल्या स्पेलमध्ये बाद केलं. या ४ षटकांच्या खतरनाक स्पेलमुळे हैदराबाद-राजस्थान सामन्याचा तो सामनावीर खेळाडू ठरला.

राजस्थान-हैदराबाद सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या. हैदराबादने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवकडून अजून एक वादळी खेळी पाहायला मिळणार, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण पहिल्याच षटकात भेदक गोलंदाजी करत प्रफुल हिंगेने सर्वांना चकित केलं. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रफुल हिंगेने दुसऱ्याच चेंडूवर वैभवला बाद केलं आणि त्यानंतर पुढच्या चार चेंडूंमध्ये ध्रुव जुरेलसह आणखी दोन बळी घेतले. एकूणच, प्रफुलने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेऊन इतिहास घडवला. तिन्ही फलंदाज एकही धाव करू शकले नाहीत.

प्रफुल हिंगेची उंची आणि भेदक गोलंदाजी यापुढे फलंदाजांनी जणू गुडघे टेकले. सामन्यानंतर प्रफुलने त्याचा सामनावीर पुरस्कार कोणाला समर्पित केला, जाणून घेऊया. सामन्यानंतर प्रफुलला विचारण्यात आलं की, तुला वाटलं होतं का की तू असं स्वप्नवत पदार्पण करशील. यावर प्रफुल म्हणाला, “हो, मी याबद्दल विचार केला होता. गेल्या वर्षी मी कुठेतरी लिहिलं होतं की जेव्हा मी माझा पहिला सामना खेळेन, तेव्हा नक्कीच चार-पाच विकेट्स घेईन. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त वर्चस्व गाजवायचं होतं. मला स्वतःवर विश्वास आहे. इतरांबद्दल माहित नाही, पण मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.”

प्रफुलने त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल सांगताना म्हटलं, “मी १३व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हा मला लेदर बॉल क्रिकेट म्हणजे काय हेही माहित नव्हतं. १३व्या वर्षी मी वडिलांना सांगितलं की मला क्लबमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी सुरुवातीला नकार दिला, म्हणाले तू अजून खूप लहान आहेस. पण त्यानंतर एकदा ते मला क्लबमध्ये घेऊन गेले आणि मी सतत खेळत राहिलो. आज या टप्प्यावर उभं राहून खूप छान वाटतं.”

प्रफुल पुढे म्हणाला, “हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला समर्पित करू इच्छितो. त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. त्यांची मेहनत आणि त्याग माझ्यासाठी सर्वकाही आहे.”

प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीला बाद करण्यासाठी काय प्लॅन केला होता?

“आजचा सर्वात महत्त्वाचा बळी म्हणजे वैभव सूर्यवंशीचा होता. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. मी आधीच काही लोकांना सांगितलं होतं की त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करेन, बाउन्सर टाकून किंवा कोणत्याही प्रकारे पण त्याला बाद करेन, पहिल्याच चेंडूवर त्याचा बळी घ्यायचा हा माझा प्लॅन होता,” वैभव सूर्यवंशीच्या विकेटसाठी केलेलं प्लॅनिंग प्रफुलने सांगितलं.

“आमचे गोलंदाजी प्रशिक्षक वरुण आरोन यांनी मला खूप मदत केली. आणि ज्यांनी मला साथ दिली त्या सगळ्यांचा मी आभारी आहे.” पूर्वी झालेल्या दुखापतींबद्दल विचारताना प्रफुल म्हणाला, “आता सगळं ठीक आहे. माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल मी एमआरएफचे आभार मानतो. तिथे असताना नवीन सर (फिजिओ) यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. आज मी या टप्प्यावर पोहोचलोय, त्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो,” असं प्रफुल हिंगे अखेरीस म्हणाला.