Praful Hinge Profile IPL Debut: प्रफुल हिंगे हे नाव एका रात्रीत सगळीकडे चर्चेचा विषय बनला. पण यामागे वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचं, कुटुंबाच्या त्यागाचं आणि असंख्य मदतींचं हे फळ आहे. २४ वर्षीय प्रफुलने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेत एकच धुव्वा उडवला. सध्या आक्रमक फलंदाजीचं वर्चस्व असलेल्या या स्पर्धेत प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीने सर्वांनाच चकित केलं. प्रफुल हिंगे क्रिकेटकडे कसा वळला आणि आयपीएलमध्ये त्याची निवड कशी झाली, त्याचा एकंदरीत प्रवास जाणून घेऊया.

प्रफुल हिंगेने सध्या आयपीएल गाजवत असलेल्या वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर बाद करत हाहाकार उडवला. त्यानंतर त्याने ध्रुव जुरेलला क्लीन बोल्ड करत षटकातील अखेरच्या चेंडूवर लुहान डे प्रिटोरियसला झेलबाद करत तिसरी विकेट घेतली. प्रफुल हिंगे आयपीएलमधील पहिल्या षटकात तीन विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

दरम्यान, नागपूरमधील एका मध्यमवर्गीय घरात एक निवृत्त सरकारी कर्मचारी आणि पहाटे उठून वर्षानुवर्षे डबा बनवणारी एक आई हा सगळा क्षण टीव्हीवर पाहत होती. मागील सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध नाणेफेकीवेळी हिंगेचं नाव प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलं, त्याचं पदार्पण ठरलं होतं. पण सनरायझर्सने २१९ धावा केल्यानंतर खेळपट्टीने साथ द्यायला सुरुवात केली आणि संघ व्यवस्थापनाने निर्णय बदलला. जयदेव उनाडकटला संघात घेतलं गेलं आणि हिंगेला बाहेर बसावं लागलं. परिस्थिती, अनुभव आणि टी-२० क्रिकेटच्या कठोर गणितामुळे त्याचं पदार्पण पुढे ढकललं गेलं.

त्याला आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागली. आयपीएल लिलावाच्या रात्री प्रफुल मंदिरात होता. तो घरी जाऊन फ्रेश झाला आणि आपल्या घराजवळच्या छोट्या मंदिरात गेला, आपल्या नावासाठी लिलावात कोणी पॅडल उचलेल की नाही, हे पाहण्यासाठी तो मंदिरात बसला होता… एका हातात मोबाईल, स्क्रीनवर लिलाव सुरू आणि समोर देव. सनरायझर्सने त्याच्यावर बोली लावली, तेव्हा त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि थेट जमिनीवर दंडवत घातला. काही क्षण तो देवाचे आभार मानत तसाच पडून राहिला.

हैदराबादने माझ्यासाठी लिलावात बोली लावली-प्रफुलने बहिणीला केलेला मेसेज

त्याच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याने आपल्या बहिणीला फोन केला, ती त्या वेळी मुंबईतून लोकल ट्रेनने ऑफिसहून घरी परतत होती. तिने फोन उचलला नाही. त्याने तिला एक मेसेज पाठवला: “हैदराबादने माझ्यासाठी बोली लावली.” तिने घरी पोहोचून त्याला व्हिडिओ कॉल केला, तेव्हा तिच्याही डोळ्यांत अश्रू होते.

वडिलांकडून प्रफुल हिंगेला वारसा म्हणून मिळाला वेग

नागपूरमधील त्या कुटुंबात रोज सकाळी ७ वाजता तीन जण घराबाहेर पडायचे. वडील त्यांच्या सरकारी नोकरीसाठी, बहीण सीएच्या शिक्षणासाठी आणि प्रफुल मैदानावर सरावासाठी. त्याचे वडील एकेकाळी वेगवान गोलंदाज होते. त्यांच्याकडून त्याला वारसा म्हणून मिळालं ते धावसंख्या किंवा ट्रॉफी नव्हे, तर वेग. त्यांनी त्याला क्रिकेट क्लबमध्ये सोडलं आणि म्हटलं, “आता पुढचं सगळं तू स्वतः करायचं, मला ऑफिसला जायचं आहे.”

प्रफुलचे वडील जवळजवळ कधीच सामने पाहायला गेले नाहीत, कारण त्यांना काळजी नव्हती म्हणून नाही, तर त्यांच्या काळजीचा अर्थच वेगळा होता: मुलाला योग्य मार्गावर उभं करणं आणि मग मागे राहून त्याला स्वतः लढू देणं. या सगळ्याची साक्षीदार होती त्याची बहीण. ती चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी शिक्षण घेत होती आणि पुढे जाऊन महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्याच घरात, पालकसभेत शिक्षक प्रफुलचं उदाहरण देत होते, अभ्यासाऐवजी क्रिकेट निवडणारा मुलगा, काय बनू नये याचं उदाहरण असायचं.

बहिण रात्रभर सीएसाठी धडे गिरवत असे. प्रफुल तिला दिवे बंद करायला सांगायचा, जेणेकरून त्याला झोपता येईल; पण ती अभ्यास सुरूच ठेवायची. तो पहाटे ४ वाजता सरावासाठी उठायचा आणि ती अजूनही पुस्तकं घेऊन अभ्यास करत असायची. घरात बहिणीचा दिवसरात्र अभ्यास आणि प्रफुलचा मैदानावरील सराव हे चित्र वर्षानुवर्षे सुरू असायचं.

१९व्या वर्षी त्याने यशाची पहिली चव चाखली. अंडर-१९ क्रिकेटमध्ये तब्बल ३६ विकेट्स त्याने घेतल्या होत्या. त्यानंतर कोविडचा काळ आला. मग एमआरएफ वेगवान गोलंदाजी प्रशिक्षण केंद्र, प्रफुल सहा महिने गोलंदाजी करू शकत नव्हता, स्वतःच्या शहरापासून दूर राहून फिजिओसोबत मेहनत घेत, काय चूक होतंय ते शोधून त्यात सुधारणा केली. त्यानंतर ब्रिस्बेनचा दौरा, तो पहिल्यांदाच परदेशात गेला होता. त्यानंतर तामिळनाडूविरुद्ध रणजी सामन्यात त्याने पाच बळी घेतले. त्यानंतर भारताचा माजी गोलंदाज आणि हैदराबाद संघाचा गोलंदाजी कोच वरुण अॅरॉनचा फोन आला, सनरायझर्ससाठी आयपीएलकरता ट्रायलसाठी हा फोन होता. त्याने दिलेल्या संधीचा पूर्ण उपयोग केला आणि निवड झाली.

प्रफुल हिंगेचा अंडर-19 क्रिकेट ते आयपीएलपर्यंतचा प्रवास

मागील हंगामात प्रफुल दुखापतीमुळे घरी बसून डोळ्यांत साठलेल्या अश्रूंसह विदर्भचा रणजी अंतिम सामना पाहत होता. यावेळी मात्र पूर्ण रणजी हंगाम, विदर्भ प्रीमियर लीग, लिलाव आणि मंदिरातील तो क्षण सगळं वेगळं होतं. उप्पलमध्ये टाकलेलं ते पहिलं षटक फक्त नैसर्गिक प्रतिभा नव्हती, त्यामागे प्रचंड मेहनत होती. डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर टाकणारा गोलंदाज, ज्याने आपल्या यॉर्करवर इतका सराव केला की तो त्याचा सर्वात विश्वासू चेंडू बनला. १४०-१४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा, जो सहा महिने गोलंदाजी करू शकत नव्हता, पण त्यानंतर आणखी फिट होऊन मैदानात परतला.

प्रफुलची मैदानावरील कामगिरी पाहून कर्णधार इशानच्या चेहऱ्यावर हसू होतं. मालकिण काव्या मारन पहिल्या षटकापासूनच आपल्या जागेवर उभी होती. आणि नागपूरमध्ये कुठेतरी पहाटे उठून डबा बनवणारी ती माऊली, तिला क्रिकेटची काहीच माहिती नव्हती पण आता मोबाईलवर मुलाचे स्कोअर पाहायला शिकलेली ती देखील हा क्षण पाहत होती.