R Praggnanandhaa beats Magnus Carlsen twice: भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने नॉर्वे चेस स्पर्धेच्या आठव्या फेरीत दिग्गज मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे, या विजयासह त्याने एका अत्यंत प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवलं आहे. २७ मे रोजी तिसऱ्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या कार्लसनला पराभूत केल्यानंतर, चेन्नईच्या २० वर्षीय प्रज्ञानंदाने पुन्हा त्याच्यावर मात करत दुहेरी धक्का दिला. विशेष म्हणजे, नॉर्वे चेसच्या २०२४ हंगामातही त्याने कार्लसनचा पराभव केला होता.
क्लासिकल बुद्धिबळाच्या गेल्या १९ वर्षांच्या इतिहासात एका स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला दोनदा पराभूत करणारा प्रज्ञानंदा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी केला होता. त्यांनी २००७ मध्ये झालेल्या लिनारेस इंटरनॅशनल चेस टूर्नामेंट मध्ये कार्लसनला दोन वेळा नमवलं होतं. या ऐतिहासिक विजयामुळे प्रज्ञानंदाने केवळ कार्लसनवर वर्चस्व सिद्ध केलं नाही, तर विश्वनाथन आनंद यांच्या बरोबरीची कामगिरी करत भारतीय बुद्धिबळाचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे.
या ऐतिहासिक विजयाची सर्वत्र चर्चा होत असली तरी आर. प्रज्ञानंद मात्र या यशाने भारावून गेलेला नाही. उलट त्याचे संपूर्ण लक्ष स्पर्धेतील एकूण कामगिरीवर केंद्रित आहे. सामन्यानंतर बोलताना प्रज्ञानंद म्हणाला, “मॅग्नसला हरवण्यापेक्षा या स्पर्धेत एक सामना जिंकणं सध्याच्या टप्प्यावर अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तो सामना जिंकू शकलो, याचा मला आनंद आहे.”
मॅग्नस कार्लसन याच्याबद्दल बोलताना भारतीय ग्रँडमास्टरने त्याच्या बचावात्मक खेळाचं देखील कौतुक केलं. “नाही, तो खरंच खूप चांगला खेळत होता आणि अप्रतिम बचाव करत होता. अशा स्थितीत इतर अनेक खेळाडू छोट्या-छोट्या चुका करू लागले असते, पण तो प्रत्येक वेळी योग्य चाल शोधत होता. एका टप्प्यावर मला खरंच वाटलं होतं की हा सामना बरोबरीत सुटणार आहे. कारण त्याने त्या क्षणापर्यंत अतिशय उत्कृष्ट बचाव केला होता. त्यामुळे त्याच्याकडून अशी चूक होईल, याचं मला आश्चर्य वाटलं.” कार्लसनसारख्या दिग्गजाला दोनदा पराभूत करूनही प्रज्ञानंदने दाखवलेली नम्रता आणि परिपक्वता ही त्याच्या खेळाइतकीच चर्चेचा विषय ठरत आहे.
विश्रांतीनंतर आर. प्रज्ञानंद पुन्हा एकदा नॉर्वे चेस स्पर्धेच्या अंतिम दोन फेऱ्यांसाठी सज्ज झाला आहे. त्याच्यासमोर आता आणखी मोठे आव्हान उभे आहे. पुढील फेरीत त्याची गाठ विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश याच्याशी पडणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत गुकेशला अपेक्षित लय सापडलेली नसली तरी हा सामना विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या प्रज्ञानंद १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आघाडीवर असलेल्या वेस्ली सो याचे १४ गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अलिरेझा फिरूझजा १३ गुणांसह आहे. अंतिम फेरीत प्रज्ञानंदचा सामना जर्मनीच्या व्हिन्सेंट केमर याच्याविरुद्ध होणार आहे.
