वृत्तसंस्था, बुखारेस्ट
भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने रोमानियामधील ‘सुपर चेस क्लासिक’ स्पर्धेच्या तिसर्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमेरविरुद्ध बरोबरीची नोंद केली. या लढतीत दोन्ही खेळाडूंचा भक्कम बचाव उल्लेखनीय ठरला. त्यांनी तुल्यबळ खेळ करताना चालींत ९९ टक्के इतकी अचूकता राखली, त्यामुळे लढत बरोबरीत सुटली.
‘ग्रँड चेस टूर’चा भाग असलेल्या या स्पर्धेच्या गेल्या फेरीत उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोवला पराभूत करणार्या प्रज्ञानंदचे दोन गुण झाले आहेत. त्यामुळे फ्रान्सचा मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह, नेदरलँड्सचा जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट, अनिश गिरी आणि केमेर यांच्यासह तो संयुक्तपणे आघाडीवर आहे. अमेरिकेचा खेळाडू फॅबियानो कारूआना आणि वेस्ली सो यांनीही आपले सर्व सामने बरोबरीत सोडविल्याने त्यांचे १.५ गुण आहेत. फ्रान्सच्या अलिरेझा फिरूझा आणि स्थानिक खेळाडू डेक बोगदान-डॅनियल यांच्या नावे अर्धा गुण आहे.
पांढर्या मोहर्यांसह खेळणार्या प्रज्ञानंदने केमेरविरुद्ध संयमाने सुरुवात केली. त्यानंतर अचूक चाली रचत विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. १६व्या चालीपर्यंत प्रज्ञानंदकडे केमेरपेक्षा तब्बल ४६ मिनिटे आणि दोन प्याद्यांची आघाडी होती. मात्र, जर्मनीचा अव्वल खेळाडू असलेल्या केमेरने अप्रतिम बचाव करताना प्रज्ञानंदचे डावपेच निष्फळ ठरवले. गेल्या काही काळापासून चांगल्या लयीत असलेल्या केमेरने फारसे दडपण न घेता लढत ६४व्या चालीनंतर बरोबरीत सोडवली. अन्य लढतीत फॉरेस्टने बोगदानला, तर गिरीने फिरूझाला पराभूत केले.
