बुद्धिबळ जगतातल्या नॉर्वे चेस या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं जेतेपद भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने जिंकत इतिहास घडवला. या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा प्रज्ञानंद हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. २०वर्षीय प्रज्ञानंदने शेवटच्या दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून केली. जर्मनीच्या विन्सेंट केमर याला नमवत प्रज्ञानंदने जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. विजयासह प्रज्ञानंदने ३ गुण पटकावले आणि १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान राखत अजिंक्यपदावर नाव कोरलं. स्पर्धेतील शेवटचे चार सामने जिंकण्याचा पराक्रमही त्याने केला.

जेतेपदापर्यंतच्या वाटचालीत प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला दोनदा नमवण्याची किमया केली. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर कार्लसनला असं हरवणारा प्रज्ञानंद केवळ दुसराच भारतीय खेळाडू आहे. २०१३ मध्ये नॉर्वे चेस स्पर्धेची सुरुवात झाली. भारतीय खेळाडूंनी सातत्याने या स्पर्धेच्या जेतेपदासाठी अविरत प्रयत्न केले पण त्यांना यश मिळू शकलं नाही. अमेरिकेच्या वेस्ली सो आणि अलिरेझा फिरुझा यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याचा फायदाही प्रज्ञानंदला मिळाला.

प्रज्ञानंदने नवव्या फेरीत भारतीय सहकारी आणि विद्यमान जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशचा अवघ्या ३४ चालींत पराभव करत जेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. या विजयामुळे प्रज्ञानंदच्या खात्यात १५ गुण झाले होते. आघाडीवर असलेल्या वेस्ली सो याच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे होता. जर्मनीच्या केमरला हरवत प्रज्ञानंदने बाजी मारली.

स्पर्धेच्या सुरुवातीला प्रज्ञानंदची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि तो गुणतालिकेच्या तळाशी घसरला होता. मात्र, गेल्या काही फेर्‍यांत त्याने अप्रतिम खेळ करताना सलग तीन विजय मिळवत थेट किताबाच्या शर्यतीत प्रवेश केला. गुकेशविरुद्धच्या लढतीतही त्याने संयम, चालींमध्ये अचूकता आणि वेळेचे उत्तम व्यवस्थापन याचा समन्वय साधत त्याने महत्त्वपूर्ण विजय नोंदवला.

महिला विभागात कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवा हिने अंतिम फेरीपूर्वीच विजेतेपद निश्चित केले. नवव्या फेरीत तिला ॲना मुझिचुककडून ‘आर्मागेडॉन’ डावात हार पत्करावी लागली. मात्र, पारंपरिक लढत बरोबरीत सोडवल्याने मिळालेल्या गुणाचा तिला फायदा झाला. भारतीय खेळाडूंमध्ये दिव्या देशमुखला चीनच्या झू जिनेरकडून पराभव पत्करावा लागला. कोनेरू हम्पी जगज्जेत्या ज्यू वेन्जूनकडून ‘आर्मागेडॉन’मध्ये पराभूत झाली.