माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माच्या इतका मोठा कर्णधार होण्यामागे ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टचा हात असल्याचे त्याने म्हटले आहे. ओझाच्या मते, गिलख्रिस्टमुळेच रोहित शर्मा इतका मोठा कर्णधार बनला आहे.

रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाकडून आयपीएल करिअरची सुरुवात केली. त्यावेळी आयपीएलमध्ये हैदराबादचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली रोहित शर्माने आयपीएलमध्ये पदार्पण केले.

कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या यशाचे बरेच श्रेय अॅडम गिलख्रिस्टला जाते, असे प्रग्यान ओझा मानतो. तो म्हणाला, “रोहित शर्मा जरी मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कर्णधार ठरला असला तरी, याचे श्रेय अॅडम गिलख्रिस्टला जाते, ज्याने रोहित शर्माची प्रतिभा ओळखून त्याला डेक्कन चार्जर्स हैदराबादचा उपकर्णधार बनवले. त्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडूही उपस्थित होते. पण गिलख्रिस्टने रोहित शर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती केली.”

हेही वाचा – VIDEO : अरे देवा..! पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूवर ‘मोठं’ संकट; फिल्डिंग करताना डोक्यावर बसला चेंडू अन्…

डेक्कन चार्जर्सकडून खेळल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला. २०१३ मध्ये रिकी पाँटिंगनंतर त्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर त्याने संपूर्ण संघाची स्थिती आणि दिशा बदलली. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

आयपीएलमधील यश पाहता रोहित शर्माची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन सामने जिंकून शानदार सुरुवात केली आहे.