BCCI Chief Selector Pragyan Ojha New Zealand Tour: भारताचे माजी खेळाडू अजित आगरकर यांचा निवड समितीतील कार्यकाळ संपला आहे. निवड समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडताना निवड समितीचे प्रमुख ही त्यांची अखेरची जबाबदारी त्यांनी पार पाडली. दरम्यान, BCCIने निवड समितीचे तात्पुरते प्रमुख असलेल्या नावाची घोषणा केली आहे.
माजी भारतीय डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याची सध्याच्या चार सदस्यीय निवड समितीच्या अंतरिम प्रमुखपदी नियुक्ती केल्याचं वृत्त आहे. २४ कसोटी सामने खेळलेला ओझा पुढे अधिकृतपणे निवड समितीचे प्रमुख म्हणूनही बढती मिळण्याची शक्यता आहे.
मंगळवारी गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियममध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीच्या चार विद्यमान सदस्यांमध्ये शिवसुंदर दास, अजय रात्रा, आर. पी. सिंह आणि प्रज्ञान ओझा यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर होणार आहे. मात्र, आगरकर या चर्चेदरम्यान उपस्थित नव्हते.
PTIच्या वृत्तानुसार, ओझा यांची निवड समितीच्या अंतरिम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून आगरकरांनंतर निवड समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांचं नाव आघाडीवर आहे. चार निवडकर्ते आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्यात चर्चा होणं नेहमीचं असलं, तरी यावेळी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण निवड समिती लवकरच भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघांची निवड करणार आहे. या दौऱ्यासाठी भारत-अ संघाचा तीन कसोटी सामन्यांचा संघ, तसेच टी-२०, वनडे आणि कसोटी संघ निवडला जाणार आहे.
निवड प्रक्रियेत सर्वात मोठं आव्हान एकदिवसीय आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकातील तफावत सांभाळण्याचं असणार आहे. भारत न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरचा वनडे सामना १५ नोव्हेंबरला खेळणार आहे, तर त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी १९ नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये पहिली कसोटी सुरू होणार आहे. त्यामुळे काही नियमित कसोटी खेळाडूंना आधीच वनडे संघातून रिलीज करून कसोटी मालिकेच्या तयारीसाठी संधी द्यावी लागू शकते. दोन्ही फॉरमॅट या सायकलमध्ये महत्त्वाचे असल्याने निवडकर्त्यांसमोर यामुळे मोठं आव्हान उभं राहणार आहे.
भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान असेल. या दौऱ्याची सुरुवात क्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. यानंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. या मालिकेची सुरुवात ४ नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये होईल. दौऱ्याची सांगता १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांनी होणार आहे.
