Prasidh Krishna Bowled Quinton De Kock Video: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी-कॉकने उत्कृष्ट शतकी खेळी केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिकेतील अखेरचा सामना विशाखापट्टणममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने सलग २० टॉस गमावल्यानंतर टॉस जिंकला. यासह संघाने द. आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना डीकॉकने शतक केल्यानंतर त्याला बाद करण्यासाठी प्रसिध कृष्णाने उत्कृष्ट चेंडू टाकला.

क्विंटन डीकॉकने सुरूवातीच्या षटकांमध्ये सावध फलंदाजी केली आणि यानंतर त्याने वेगाने धावा करायला सुरूवात केली. क्विंटन या सामन्यात सलामीला उतरला होता आणि त्याने उत्कृष्ट खेळी केली. क्विंटनने ८० चेंडूत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत शतक झळकावलं. एका टोकाकडून विकेट्स पडत असतानाही त्याने आपल्या धावांची गती कमी न करता फलंदाजी केली.

डीकॉकने प्रसिधच्या एका षटकात २ षटकार व २ चौकार लगावत १८ धावा कुटल्या होत्या. ज्यामुळे प्रसिधच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याची चांगलीच धुलाई झाली. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये प्रसिधने चांगली गोलंदाजी केली. प्रसिधच्या ३३व्या षटकातील पाचवा चेंडू योग्य लाईन लेंग्थसह त्याने टाकला होता. चेंडू बॅटची कड घेत स्टंपवर जाऊन आदळला.

कुलदीपचा चेंडू स्टंपवर आदळल्यानंतर बाजूचे दोन्ही स्टंप एखाद्या डिजाईनप्रमाणे दोन्ही बाजूने हवेत उडाले, ज्याचा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. प्रसिध कृष्णाचं पहिल्या स्पेलनंतर कमबॅक पाहून सर्वच जण थक्क झाले आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याने घेतलेल्या या विकेटचे फोटो व्हायरल केले आहेत.

क्विंटन डीकॉकच्या विकेटपूर्वी प्रसिधने २८व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू ब्रिट्झकेला पायचीत केलं आणि त्याला माघारी धाडलं, बावुमाच्या विकेटनंतर ब्रिटेझके डीकॉकसह वेगाने धावा करत होता. पण प्रसिधने त्याला बाद करताच संघाला महत्त्वाची विकेट मिळाली. यानंतर त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने फॉर्मात असलेल्या एडन मारक्रमला झेलबाद करत माघारी धाडलं. यानंतर ४८व्या षटकात त्याने ओटनील बार्टमनला क्लीन बोल्ड करत चौथी विकेट घेतली.

प्रसिधने तिसऱ्या वनडे सामन्यात खराब सुरूवातीनंतर चांगली कामगिरी केली. प्रसिधने ९.५ षटकांत ६६ धावा देत ६.७०च्या इकॉनॉमीने ४ विकेट्स घेतल्या.