पीटीआय, बर्मिंगहॅम
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ सध्या बर्मिंगहॅम येथे सरावात गर्क आहे. शनिवारच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत प्रसिधने नव्या कसोटी सामन्याविषयी बोलण्यापेक्षा पहिल्या कसोटी सामन्यावर भाष्य करताना अपयशाची पूर्ण जबाबदारी माझीच असल्याचे सांगितले.
पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून दोनशेपेक्षा अधिक धावा दिल्यानंतर माजी खेळाडूंनी प्रसिधला टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘‘मला निश्चितपणे हव्या असलेल्या दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करता आली नाही. खेळपट्टीच्या एका बाजूला असलेल्या उताराची सवय होण्यासाठी मला थोडा वेळ लागला. अर्थात, मला कोणतेही कारण द्यायचे नाही. एक व्यावसायिक खेळाडू असताना मला ते जमणे आवश्यक होते. मी याची जबाबदारी घेण्यास तयार आहे. कदाचित पुढील सामन्यात अधिक चांगल्या पद्धतीने समोर येईन,’’ असे प्रसिध म्हणाला.
प्रसिधने पहिल्या डावात २० षटके गोलंदाजी करताना १२८ धावा दिल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात २० षटके टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजाची ही सर्वात वाईट कामगिरी होती. अर्थात, त्याने ओली पोप, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांना बाद करण्यात यश मिळविले. दुसऱ्या डावातही त्याने झॅक क्रॉली आणि पोप यांना बाद करून भारताला आशा निर्माण करून दिली होती. पण, या वेळीदेखील त्याने १५ षटकांत ९२ धावा दिल्या.
‘‘षटक निर्धाव टाकायचे याच उद्देशाने मी गोलंदाजी करतो. चौकार सोडा एखादी धावही द्यायची नाही यासाठी माझा प्रयत्न असतो. मैदान वेगवान होते. मी ज्या दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली ती बहुतेक वेळा परिपूर्ण नसावी आणि त्याने माझा घात केला,’’ असेही प्रसिध म्हणाला.
‘‘हेडिंग्ली येथे वारा हा आणखी एक मोठा घटक होता. वातावरणही अनेकदा धूसर आणि थंड राहात होते. त्यामुळे खेळणेही कठीण होते. तुम्ही जोरात धावण्याचा प्रयत्न करत असता. पण, वारा कधी असतो, तर कधी नसतो. त्यामुळे धावण्याच्या गतीचाही अंदाज येत नव्हता. आणखी एक गोष्ट म्हणजे अधूनमधून पाऊस पडल्याने चेंडू खेळपट्टीवर पडला की ओला व्हायचा आणि चेंडूची लकाकी जाऊन तो मऊ होत गेला. याचाही गोलंदाजीवर फरक पडला,’’ असेही सांगून प्रसिधने आपल्या अपयशाला झाकण्याचा एक प्रयत्न केला.
‘‘ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप चांगले आणि सकारात्मक आहे. प्रत्येक खेळाडूला प्रेरित होण्यासाठी जसे वातावरण अपेक्षित आहे, तसेच ते आहे. मैदानावर आम्ही विजयासाठी कायम प्रयत्नशील राहिलो. इंग्लंडला विजयासाठी २० धावांची आवश्यकता असताना काही तरी वेगळे घडेल या आशेने नवा चेंडूदेखील घेतला. आम्ही कठोर परिश्रम घेतले यात शंकाच नाही. कदाचित यामुळेच चौफेर टीका होत असताना आम्हाला प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून पाठिंबा मिळाला,’’ असे प्रसिधने सांगितले.
आम्ही एकमेकांकडून शिकत आहोत. तिथे कोण आहे, कोण नाही हे महत्त्वाचे नाही. अनुभव हा मिळत नसतो, तर तो घ्यायचा असतो. – प्रसिध कृष्णा, भारताचा वेगवान गोलंदाज.