वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च महिन्यात होणाऱ्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय महिला संघात फलंदाज प्रतिका रावल, डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा, वेगवान गोलंदाज क्रांती गौड या तिघींचा समावेश करण्यात आला आहे. तिघींचीही प्रथमच कसोटी संघात निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलियात पर्थ येथे ६ ते ९ मार्च या कालावधीत हा सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपासूनच भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी उभय संघांत तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे प्रतिकाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून मध्येच बाहेर पडावे लागले होते. आता ती बऱ्यापैकी तंदुरुस्त झाली असली, तरी तिचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वैष्णवी आणि क्रांती यांनी अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या सामन्यांत चमक दाखवली आहे. मुंबईच्या सायली सातघरे हिला कसोटी संघात स्थान देताना अनुभवी अरुंधती रेड्डीला वगळण्यात आले आहे. युवा यष्टिरक्षक जी. कमिलीनी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनच बाहेर झाल्यामुळे उमा छेत्रीला संघात स्थान मिळाले आहे.

कसोटी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, रिचा घोष (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सतघरे. उदयोन्मुख संघही जाहीर उदयोन्मुख खेळाडूंच्या आशियाई स्पर्धेसाठी अनुष्का शर्माची भारतीय ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व राधा यादवकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेचे पहिलेच पर्व १३ ते २२ फेब्रुवारीदरम्यान थायलंडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ संयुक्त अरब अमिराती (१३ फेब्रुवारी), पाकिस्तान ‘अ’ (१५ फेब्रुवारी), नेपाळ (१७ फेब्रुवारी) संघांशी खेळणार आहे.

संघ : राधा यादव (कर्णधार), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दीया यादव (तंदुरुस्तीवर अवलंबून), तेजल हसबनीस, नंदिनी कश्यप (यष्टिरक्षक), ममता एम (यष्टिरक्षक), सोनिया मेंधिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकूर, जिंतामणी कलिता, नंदिनी शर्मा.