उलानबटार : भारताची उदयोन्मुख बॉक्सिंगपटू प्रीती पवारने पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या कोरियाच्या एजी इमला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, अनुभवी निकहत झरीन आणि लवलिना बोरगोहेन यांना सोमवारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला.

प्रिया आणि अरुंधती चौधरी या अन्य दोघी भारतीय खेळाडूंनीदेखील उपांत्य फेरीतील विजयासह आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली. निकहत, लवलिनाप्रमाणे जागतिक पदक विजेती पूजा राणी आणि अंकुशिता बोरो यांनादेखील उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्रीतीचा चमकदार विजय

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीतीचा विजय उपांत्य फेरीतील सर्वात आकर्षक ठरला. तिने अत्यंत संयमी आणि प्रभावी कामगिरी करत तिन्ही फेर्यांमध्ये इमवर वर्चस्व गाजवले आणि ५-० असा एकतर्फी कौल मिळवला. आता सुवर्णपदकासाठी तिचा सामना तीनवेळची जागतिक विजेती तैवानच्या हुआंग हसियाओ-वेनशी होईल.

महिलांच्या ६० किलो वजनी गटात प्रियाने स्थानिक खेळाडू नामून मोंखोर हिच्याविरुद्ध ५-० असाच एकतर्फी कौल मिळविला. विजेतेपदासाठी तिचा सामना उत्तर कोरियाच्या उन ग्योंग वॉनशी होईल. अरुंधतीने ७० किलो गटात उझबेकिस्तानच्या ओयशा टोइरोव्हावर ४-१ असा विजय मिळवत सर्वांना प्रभावित केले. अंतिम फेरीत तिचा सामना कझाकस्तानच्या बाकित सेदिशशी होईल.

प्रमुख खेळाडूंचे पराभव

दोन वेळची जागतिक विजेती निकहत झरीनला मात्र ५१ किलो गटात विद्यमान ऑलिम्पिक पदक विजेती चीनची वू यू कडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. निकहतचा या चिनी खेळाडूकडून झालेला हा दुसरा पराभव आहे; यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही वू यूने तिला हरवले होते.

टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोरगोहेनला ७५ किलो गटात उझबेकिस्तानच्या अझीझा झोकिरोव्हाकडून ०-५ ने पराभूत व्हावे लागले. ७० किलो गटातील जागतिक कांस्यपदक विजेत्या झोकिरोव्हाविरुद्धची ही लवलिनाची या स्पर्धेतील पहिलीच लढत होती. अन्य एका लढतीत ६५ किलो गटात अंकुशिता बोरो हिला तैवानच्या निएन-चिन चेनकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. या लढतीत पहिल्या फेरीनंतर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सामन्यात व्यत्यय आला होता, त्यानंतर गुणांच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला.

महिलांच्या ८० किलो गटात पूजा राणीला कझाकस्तानच्या नादेझदा र्याबेट्सकडून ०-५ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले आणि तिचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या जागतिक पदक विजेत्या मीनाक्षी हुडा (४८ किलो) आणि जॅस्मिन लॅम्बोरिया (५७ किलो) आज, मंगळवारी उपांत्य फेरीची लढत खेळतील.