CWG 2026 Boxing Gold Preeti Pawar Jaismine Lamboria: अखेर भारताला ज्या ऐतिहासिक सुवर्णपदकांची प्रतीक्षा होती, ती मिळाली! भारताच्या लेकी प्रीती पवार व जास्मिन लम्बोरिया यांनी ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाईकरून दिली आहे. आशियाई विजेती असलेल्या प्रीतीने आता कॉमनवेल्थ विजेतेपदाचाही मान पटकावला आहे. अंतिम सामन्यात तिने स्कार्लेट सवाना डेलगाडो हिचा ५-० अशा एकमताने (युनॅनिमस डिसिजन) पराभव करत दमदार शैलीत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

विद्यमान विश्वविजेती जयस्मिन लम्बोरिया हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये महिला ५७ किलो गटाच्या अंतिम सामन्यात उत्तर आयर्लंडच्या विद्यमान विजेत्या मायकेला वॉल्श हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव करत भारताला बॉक्सिंगमधील दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे, मागील कॉमनवेल्थ स्पर्धेत जास्मिनने कांस्यपदक जिंकलं होतं, तर यावेळी तिने सुवर्णपदकावर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरी केली.

प्रीती पवारने बॉक्सिंगमध्ये उघडलं भारताच्या पदकांंचं खातं

भिवानीच्या प्रीती पवारने बॉक्सिंगमधील भारताचे पदकांचे खाते उघडत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं आहे. प्रीती पवारने अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. महिला ५४ किलो गटाच्या अंतिम लढतीत भारतीय बॉक्सरने स्कार्लेट सवाना डेलगाडो हिच्याविरुद्ध पहिली फेरी पूर्णपणे आपल्या नावावर केली. पंचांच्या ५-० अशा एकमताच्या निर्णयाने प्रीतीने पहिली फेरी जिंकली. पाचही पंचांनी तिला १०-९ असे समान गुण दिले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी आणखी दोन फेऱ्यांची लढत बाकी होती.

पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीतही प्रीती पवारने पूर्ण वर्चस्व गाजवलं. या फेरीत प्रतिस्पर्धी स्कार्लेट सवाना डेलगाडो हिला एक दंड गुण (पेनल्टी पॉइंट) देण्यात आला, त्यामुळे भारतीय बॉक्सरचं पारडं आणखी जड झालं. दुसऱ्या फेरीनंतरही पाचही पंचांनी २०-१८ अशी गुणसंख्या देत प्रीतीची आघाडी कायम असल्याचं स्पष्ट केलं.

जास्मिन लम्बोरियाची सुवर्णपदकाला गवसणी

प्रीतीनंतर, जस्मिन लम्बोरियानेही ग्लासगोमध्ये आपल्या बॉक्सिंग कौशल्याची चुणूक दाखवली आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जस्मिन लम्बोरियाने उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा ५-० असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. तिने यापूर्वी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘लाइटवेट’ गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं; हे तिचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरं पदक ठरलं. या दोन सुवर्णपदकांमुळे, या स्पर्धेत भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.