पंजाब किंग्सने आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची सुरुवात दणक्यात केली होते. सलग सहा सामने जिंकल्यानंतर आता प्लेऑफच्या तोंडावर आल्यानंतर संघाने ४ सामने गमावली आहेत. संघाच्या पराभवाच्या मालिकेदरम्यान समोर आलेल्या काही बातम्यांमुळे आता पंजाब किंग्सचे व्यवस्थापन आणि प्रीती झिंटा संतापले आहेत.

सलग चार पराभवांनंतर, सलामीवीर प्रभसिमरन सिंगचे वजन १० किलोने वाढल्याच्या वृत्ताचे प्रीती झिंटा आणि पंजाब किंग्सच्या व्यवस्थापनाने स्पष्टपणे खंडन केले आहे. त्यांनी याला केवळ संघाच्या ब्रँडिंगला नुकसान पोहोचवण्यासाठी पसरवलेले खोटे म्हटले आहे.

पंजाब किंग्सच्या सलग चार पराभवांनंतर, संघात मोठ्या प्रमाणावर बेशिस्त असल्याचे सांगणारा एक अहवाल समोर आला. त्यात म्हटलं होतं की, गेल्या आठवड्यात प्रभसिमरन सिंगचे वजन १० किलोने वाढले होते. खेळाडूही निवांत होते, पहाटेपर्यंत गेम्स खेळून नंतर सराव सत्र चुकवत होते. खेळाडूंची विमाने चुकत होती आणि ते सामने हरत आहेत. त्यामुळे त्यांचा फॉर्म खराब असणे यात आश्चर्य नाही.

प्रीती झिंटा आणि पंजाब किंग्स व्यवस्थापनाने आता अशा वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी ही वृत्त पूर्णपणे मूर्खपणाची आणि खोटी असल्याचं म्हटलं आहे. प्रीती झिंटा म्हणाली की, “टीका आणि हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवणं यात फरक आहे. खेळाबद्दलची चर्चा स्वागतार्ह आहे, परंतु एखाद्या संघाला किंवा ब्रँडला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर खोटी माहिती पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. झिंटाने सांगितलं की, विश्वसनीय स्रोत आणि माध्यम व्यावसायिकांसह सर्वांनी अशी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी जबाबदारी घ्यावी, असे आवाहन ती करते.”

पंजाब किंग्सने म्हटलं आहे की, “क्षुल्लक प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोट्या बातम्या आणि बनावट गोष्टी पसरवणं हा खेळाचा भाग नाही. चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी सर्वांनी तथ्यांची पडताळणी करावी, असे आम्ही आवाहन करतो.”

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले असून, त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. एका सामन्यात त्यांना गुण विभागून घ्यावे लागले. या ११ सामन्यांनंतर, त्यांचे १३ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून, प्लेऑफसाठीच्या शर्यतीत आहेत.