Preity Zinta takes legal rout Punjab Kings co owners Mohit Burman : आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी सर्व संघांनी संघबांधणीसाठी तयार केली आहे. कारण यंदा आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे. यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) च्या मालकांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. या फ्रँचायझीच्या सह-मालकांमधील शेअर्सबाबतचा वाद सार्वजनिक झाला आहे. आता पीबीकेएस सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने या संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रीतीने सहमालक आणि प्रवर्तक मोहित बर्मन यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पंजाब किंग्ज संघाचे कोण आहेत सहमालक?
या याचिकेत प्रीतीने मोहितला आयपीएल फ्रँचायझीमधील शेअर्सचा काही भाग इतर कोणत्याही तृतीय पक्षाला विकण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, प्रीतीने लवाद आणि सामंजस्य कायदा-१९९६ च्या कलम ९ अंतर्गत न्यायालयाकडून अंतरिम उपाय आणि निर्देश मागितले आहेत. बर्मन यांच्याकडे केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बहुतांश हिस्सा आहे. तो ४८ टक्के समभागांसह फ्रँचायझीचा सर्वात मोठा भागधारक आहे, तर झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे प्रत्येकी २३ टक्के हिस्सा आहे. उर्वरित समभाग चौथा मालक करण पॉल यांच्याकडे आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
बर्मन हे आयुर्वेदिक आणि एफएमसीजी कंपनी डाबरचे अध्यक्ष आहेत. ते कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) फ्रँचायझी सेंट लुसिया किंग्सचे संचालक आणि सह-मालक देखील आहेत. बर्मन आपले ११.५ टक्के शेअर्स तृतीय पक्षाला विकण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला प्रीती विरोध करत आहेत. मात्र, त्यांना त्याच्या शेअर्सचा काही भाग कोणाला विकायचा आहे? सध्या ते स्पष्ट नाही. मात्र, बर्मन यांनी शेअर्स विकल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
क्रिकबझच्या मते, बर्मन म्हणाले, “माझे शेअर्स विकण्याची माझी कोणतीही योजना नाही.” बर्मन यांनी त्यांचे शेअर्स विकण्याची योजना नाकारली असली तरी या प्रकरणाबाबत अनिश्चितता कायम आहे. प्रीती आणि वाडिया यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, त्यांच्या व्यवस्थेनुसार विशिष्ट सह-मालक त्याच्या जुन्या सह-मालकांना प्रथम ऑफर केल्याशिवाय त्याचा शेअर्स तृतीय पक्षाला विकू शकत नाही. इतर सह-मालकांनी शेअर्स खरेदी करण्यास नकार दिला तरच हे शेअर्स कोणालाही विकले जाऊ शकतात. पंजाब फ्रँचायझीची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. आयपीएलच्या १७ वर्षांच्या इतिहासात पंजाबचा संघ केवळ एकदाच फायनलमध्ये पोहोचला आहे, जिथे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.