Preity Zinta and Shreyas Iyer Tense chat Video: मागील हंगामातील उपविजेता संघ, पंजाब किंग्स, आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने सलग सहा सामने जिंकून आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून हंगामाची शानदार सुरुवात केली होती, पण आता संघाची लय बिघडल्याने त्यांना सलग सहा पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. पंजाबच्या आरसीबीविरूद्ध पराभवानंतर संघ श्रेयस अय्यरबरोबर संघाची मालक प्रीती झिंटा चर्चा करताना दिसली.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात धरमशालामध्ये सामना खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीने पंजाबवर २३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आरसीबी यंदा प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला. तर पंजाब किंग्सला प्लेऑफ गाठण्यासाठी लखनौविरूद्ध विजयासह इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

पंजाब किंग्ससाठी आता प्लेऑफमध्ये पोहोचणं खूप कठीण झाले आहे. लीग टप्प्यात फक्त एक सामना शिल्लक असताना, पंजाबने १३ सामन्यांमधून १३ गुण मिळवले आहेत. त्यांनी आपला शेवटचा सामना जिंकला, तरी त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पंजाब जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंतच पोहोचू शकतो, तर राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादसारखे संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. याचा अर्थ पंजाबच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना, विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांच्या अर्धशतकांच्या बळावर आरसीबीने आपल्या निर्धारित २० षटकांत २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्सची आघाडीची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. शशांक सिंगच्या ५७ धावांच्या खेळीमुळे संघाला १९९ धावांपर्यंत पोहोचता आलं. पण गोलंदाजीत अखेरच्या षटकांमध्ये बऱ्याच धावा दिल्याने संघ २२३ धावांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला.

पंजाब किंग्सचा सामना पाहण्यासाठी मालक प्रीती झिंटा स्टेडियममध्ये उपस्थित होती. प्रीती झिंटा पतीसोबत संघाच्या प्रत्येक कामगिरीचं कौतुक करताना दिसली. पण संघाच्या पराभवानंतर मात्र प्रीती झिंटा चिंतेत दिसली. सामन्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी भेटी घेत चर्चा करताना दिसले. यादरम्यान प्रीती झिंटा कर्णधार श्रेयस अय्यरसह गहन चर्चा करताना दिसली. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. या दोघांच्या चर्चेचे फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहेत.