लंडन : चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या बलाढय़ संघांनी इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये दिमाखदार विजयांची नोंद केली. चेल्सीने नॉर्विचचा ७-० असा धुव्वा उडवला, तर मँचेस्टर सिटीने ब्रायटनला ४-१ असे पराभूत केले.

चेल्सीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मेसन माऊंटने आठव्या मिनिटाला चेल्सीचे गोलचे खाते उघडले. मग कॅलम हडसन-ओडोई (१८वे मिनिट), रीस जेम्स (४२वे मि.), बेन चिलवेल (५७वे मि.) आणि मॅक्स अ‍ॅरॉन्स (६२वे मि., स्वयंगोल) यांनी गोलची भर घातली. त्यानंतर माऊंटने (८५ आणि ९०+१वे मि.) आणखी दोन करत वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण करतानाच चेल्सीला ७-० असा विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत, मँचेस्टर सिटीने फील फोडेनचे (२८ आणि ३१वे मि.) दोन गोल, तर इल्काय गुंडोगन (१३वे मि.) आणि रियाद महारेज (९०+५वे मि.) यांच्या एका गोलमुळे ब्रायटनला ४-१ असे नमवले. नऊ सामन्यांतील सात विजयांच्या २२ गुणांसह चेल्सी अग्रस्थानी, तर सिटी सहा विजयांच्या २० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

एसी मिलानची बोलोन्यावर मात

एसी मिलानने सेरी ए फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात बोलोन्यावर ४-२ अशी मात केली. मिलानकडून राफाएल लेयाओ (१६वे मि.), डाव्हिडे कलाब्रिया (३५वे मि.), इस्माईल बेनासेर (८४वे मि.) आणि झ्लाटान इब्राहिमोव्हिच (९०वे मि.) यांनी गोल केले. मिलानचा हा नऊ सामन्यांत आठवा विजय ठरला.