भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर आणि इराणचा ऑलिम्पिक विजेता जावेद फोरौघी यांनी एकत्रित खेळताना ‘आयएसएसएफ’ प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मनू-जावेद जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत फ्रेंच-रशियन जोडी माथिल्डे लामोल्ले आणि आर्टेम चेर्नोसोव्हचा १६-८ असा पराभव केला. पात्रता फेरीत मनू-जावेदने मिळून ६०० पैकी ५८२ गुण मिळवत उपांत्य फेरी गाठली आणि चार जोड्यांमध्ये सर्वाधिक गुणांची कमाई करत अंतिम फेरीत धडक मारली. याच नेमबाजी प्रकारात, भारताच्या अभिषेक वर्माला युक्रेनच्या ओलेना कोस्तेविचसोबत खेळताना सहाव्या, तर सौरभ चौधरीला स्वित्झर्लंडच्या हैदी गर्बर डायथेल्मसह खेळताना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यशस्विनी देस्वाल आणि स्लोव्हाकियन जुराज तुझीन्स्की जोडीला अव्वल आठमध्ये प्रवेश मिळवता आला नाही.

दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी सांघिक गटात चीनच्या लिहाओ शेंग आणि रोमानियाच्या लॉरा-जॉर्जेटा इली जोडीने सुवर्णपदक पटकावले. पहिल्यांदाच होत असलेल्या प्रेसिडेंट्स चषक स्पर्धेसाठी आयएसएसएफने विविध देशांतील आंतरराष्ट्रीय नेमबाजांच्या जोड्या तयार केल्या आहेत.