दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरील मानहानीकारक पराभवाच्या आठवणी मागे सारून ‘आशियाई महासत्ता’ असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय संघाचे अभियान बुधवारपासून सुरू होत आहे. नवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा सलामीचा सामना रंगणार आहे तो बांगलादेशशी. यावेळी २०१२च्या स्मृती ताज्या आहेत. त्यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जिव्हारी लागणारे पराभव पत्करून भारतीय संघ आशिया चषक स्पध्रेत सहभागी झाला होता. आशिया चषक स्पध्रेचे हे १२वे पर्व. परंतु पाच जेतेपदे खात्यावर जमा असल्यामुळे भारतीय संघ या स्पध्रेत आत्मविश्वासाने सज्ज झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ०-१ आणि एकदिवसीय मालिकेत ०-२ अशी हार पत्करणाऱ्या भारतीय संघाची पराभवाची मालिका किवी भूमीवरसुद्धा संपली नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेत्या संघाल गेल्या दोन परदेश दौऱ्यावर विजयाचे दर्शन घडले नाही. परंतु बुधवारच्या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. कारण बांगलादेशविरुद्ध भारताच्या कामगिरीची आकडेवारी अनुकूल आहे. त्यामुळे २०१४ या कॅलेंडर वर्षांतील पहिला विजय भारताला नोंदवता येऊ शकेल.
बांगलादेशचा आक्रमक सलामीवीर तामिम इक्बालने दुखापतीमुळे स्पध्रेतून माघार घेतली आहे, तर अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर दोन सामन्यांची बंदी आहे. मश्रफी मुर्तझाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे, तर कर्णधार मुशफिकर रहिमच्या बोटाला झालेली दुखापत अद्याप बरी झालेली नाही. संघनिवडीबाबत झालेल्या वादामुळे बांगलादेश संघाचे चित्र हे समाधानकारक नक्कीच नाही. आपल्याशी सल्लामसलत न केल्याशिवाय संघ निश्चि करणाऱ्या निवड समिती अध्यक्षांवर कर्णधार मुशफिकरने तोफ डागली आहे.
भारतीय संघ दुखापतग्रस्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न बाळगून येथे आला आहे. या संघात डावखुऱ्या सुरेश रैनाचाही समावेश नाही. परंतु तरीही बांगलादेशच्या ताकदीपुढे भारताला विजयी सलामी नोंदवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारताची फलंदाजीची धुरा असेल ती अर्थात अविस्मरणीय फॉर्मात असलेल्या विराट कोहलीवर. त्याची बांगलादेशविरुद्धची सरासरी १२२ धावा इतकी आहे.
मागील आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत कोहलीने चार शतके आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक ७३२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर कोहलीने १८५ धावांची घणाघाती खेळी साकारली होती. धोनीच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. श्रीलंकेचा समावेश असलेल्या त्या स्पध्रेत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सात विजय मिळवले होते, तर एका सामन्यात पराभव पत्करला होता. परंतु आशिया चषक स्पध्रेत बलाढय़ श्रीलंका आणि परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धची लढत आव्हानात्मक असेल.
कसोटी संघाती नियमित फलंदाज चेतेश्वर पुजारामुळे भारताला मधल्या फळीत स्थर्य मिळू शकेल. परंतु एकदिवसीय क्रिकेट प्रकारासाठी तो कशी अनुरूपता दाखवतो, हे मैदानावरच ठरेल. कोहली तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यामुळे सौराष्ट्रचा तंत्रशुद्ध फलंदाज पुजारा कोणत्या क्रमांकवर फलंदाजीला उतरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयपीएलमध्ये आपल्या यष्टीरक्षणापेक्षा धडाकेबाज फलंदाजीने दिनेश कार्तिक सर्वाचे लक्ष वेधतो. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. याचप्रमाणे रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांच्यावरही कामगिरीचे दडपण असेल. या परिस्थितीत निर्णायक क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीला संघात स्थान मिळू शकते. बिन्नी कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजीही टाकतो.
मागील आशिया चषक स्पध्रेत बांगलादेशने आश्चर्यकारक कामगिरी साकारत उपविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी बांगलादेशने भारत आणि श्रीलंकेला हरवण्याची किमया साधली होती. त्यामुळे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी बांगलादेशचा संघ उत्सुक आहे. या पाश्र्वभूमीवर भारताचा मार्ग मुळीच सोपा नसेल.

भारताला धक्का देऊन किती वेळा पराभूत केले, याची गणती नाही. यापूर्वी बऱ्याचदा आम्ही हा पराक्रम करून दाखवला आहे. आशिया खंडात खेळताना भारतीय संघ बलवान असतो आणि ते आमच्या ध्यानात आहे. भारतीय संघ द. आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये इथल्यापेक्षा भिन्न खेळपट्टीवर खेळला. त्याचबरोबर या स्पर्धेत आम्हाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असेल. त्यामुळे आम्ही भारताला कडवी झुंज देऊन त्यांना पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्न करू.
मश्रफी मुतर्झा, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज

प्रतिस्पधी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण आरोन, इश्वर पांडे, अमित मिश्रा, अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी.
बांगलादेश : मुशफिकर रहिम (कर्णधार/यष्टीरक्षक), अल-अमित हुसैन, अराफन सन्नी, मश्रफी मुर्तझा, नईम इस्लाम, रुबेल हुसैन, शाकिब-अल-हसन, झियाऊर रेहमान, अब्दुर रझाक, अनामूल हक, इम्रूल कायेस, मोमिनूल हक, नासिर हुसैन, शमसूर रेहमान, सोहग गाझी.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.