भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकटय़ाने खेचून आणलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे मध्यमगती गोलंदाज इशांत शर्माने एका षटकात ३० धावा देत मातेरे केले. या पाश्र्वभूमीवर नेमका विश्वास कोणावर ठेवायचा, हा धोनीपुढे चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळी प्रश्न पडला असला तरी आतापर्यंतच्या अनुभवाच्या जोरावर त्याने संघाची पुनर्बाधणी केली तर नक्कीच भारताची विजयी पताका डौलाने फडकू शकते. धोनीच्या घरच्या मैदानात होणारा सात एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना बुधवारी रंगणार आहे. या सामन्यात विजयासह भारतीय संघ मालिकेत २-२ बरोबरी करण्यासाठी उत्सुक असेल, तर दुसरीकडे विजयासह मालिकेतील आघाडी कायम राखण्याच्या जॉर्ज बेलीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा मानस असेल.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी उघडय़ावर पडली, पण धोनीने धडाकेबाज नाबाद शतक झळकावत संघाला तीनशे धावांचा उंबरठा ओलांडून दिला. शिखर धवन, रोहित शर्मा यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, तर युवराज सिंग आणि सुरेश रैना या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला नाही. विराट कोहली सातत्याने फलंदाजी करत असला तरी त्याच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. धोनीला गवसलेला सूर ही संघाला नक्कीच सुखावणारी बाब आहे.
गोलंदाजीमध्ये इशांत शर्माला सातत्याने वाईट कामगिरी करूनही भारतीय संघ कसा काय संधी देतो, हे कोडेच आहे. भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजी बोथट वाटत आहे.
ट्वेन्टी-२०च्या मुशीत जन्मलेला जॉर्ज बेली आणि त्याचा संघ एकदिवसीय क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. अॅरोन फिन्चसारखा चांगला सलामीवीर त्यांना गवसला आहे. बेली मधल्या फळीची धुरा समर्थपणे वाहताना दिसतो, तर तळाच्या फळीत जेम्स फॉल्कनर संघासाठी आधारस्तंभ ठरत आहे. तिसऱ्या सामन्यात त्याची फलंदाजी अफलातून होती.
गोलंदाजीमध्ये बरेच नवीन चेहरे संघात असले तरी फॉल्कनर आणि मिचेल जॉन्सन यांच्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे. या दोघांचीही आतापर्यंतच्या मालिकेतील कामगिरी चांगली राहिलेली आहे. झेव्हियर डोहर्टी आणि क्लिंट मकाय हे आपली जबाबदारी ओळखून आहेत आणि त्यानुसार धावा वाचवताना दिसत आहेत.
येथील जेएससीए स्टेडियची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याने भारताकडून ‘लेग स्पिनर’ अमित मिश्राला खेळवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध १९ धावांत ३ बळी मिळवत भारताला सामना जिंकवून दिला होता.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर. विनय कुमार, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, मोहम्मद शामी.
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), फिलीप ह्य़ुजेस, आरोन फिन्च, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, अॅडम व्होग्स, कॅल्युम फग्र्युसन, मॉइझेस हेन्रिक्स, मिचेल जॉन्सन, क्लिंट मकाय, जेम्स फॉल्कनर, झेव्हियर डोहर्टी, नॅथन कोल्टियर निले.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स, डीडी नॅशनल.
वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.
इशांत मानसिकदृष्टय़ा सक्षम होईल -रैना
रांची : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात ३० धावा देऊन टीकेचा धनी ठरलेल्या इशांत शर्माला चौथ्या सामन्यात वगळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पत्रकार परीषदेला आलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने इशांतची बाजू घेत तो या साऱ्या गोष्टींनंतर मानसिकदृष्टय़ा सक्षम होईल, असे म्हटले आहे.
‘‘ इशांत मानसिकदृष्टय़ा सक्षम होईल आणि त्याचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, अशी मला आशा आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो गोलंदाजीवर कठोर मेहनत घेत आहे.’’ असे रैना म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2013 रोजी प्रकाशित
भारतीय संघ बरोबरीसाठी उत्सुक
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकटय़ाने खेचून आणलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे मध्यमगती गोलंदाज इशांत शर्माने एका षटकात ३० धावा देत मातेरे केले.
Written by admin

First published on: 23-10-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preview india vs australia 4th odi ranchi
