दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताने तिसऱ्याच सामन्याला ३-० अशी मर्दुमकी गाजवली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत संधीच्या प्रतीक्षेत असलेले भारतीय खेळाडू ‘एक संधी द्या मज आणुनी’ हीच साद घालणार आहेत. कसोटीमध्ये स्थिरावलेला फलंदाज चेतेश्वर पुजारा, हरयाणाचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा आणि जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूल एकदिवसीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. याचप्रमाणे मुंबईचा हरहुन्नरी फलंदाज अजिंक्य रहाणेसुद्धा गेले सहा महिने भारतीय संघाचे दार ठोठावतो आहे.
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी बुलावायो येथे होत असून, मालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ झुंजणार आहे. भारताकडून रहाणेला गुरुवारी संधी मिळण्याची शक्यता आहे, तर पुजारा मधल्या फळीत खेळू शकेल. याचप्रमाणे रसूलसद्धा अष्टपैलू रवींद्र जडेजा किंवा अमित मिश्राची जागा घेऊ शकेल. या परिस्थितीमध्ये मोहितला संघात स्थान मिळवणे कठीण जाणार आहे, कारण भारताचा वेगवान मारा हा युवा गोलंदाजांचाच आहे. जयदेव उनाडकट, मोहम्मद शामी आणि आर. विनय कुमार या तिघांवर भारताची मदार आहे. परंतु फारशी समाधानकारक कामगिरी न करणाऱ्या विनय कुमारऐवजी कप्तान विराट कोहली मोहितला संधी देऊ शकेल.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत कोहली आणि शिखर धवन यांनी चांगल्या धावा काढल्या आहेत. याचप्रमाणे अंबाती रायुडूनेसुद्धा या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये १०१ धावा काढून आपल्या संधीचे सोने केले आहे. तथापि, रोहित शर्माची कामगिरी मात्र निराशाजनक होत आहे. तीन सामन्यांत त्याने फक्त ३५ धावा केल्या आहे. उर्वरित सामन्यांमध्ये त्याला सूर गवसेल, अशी अपेक्षा आहे.
गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा या मालिकेत सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. त्याच्या खात्यावर ९ बळी जमा आहेत. याशिवाय उनाडकट व शामी यांनीही आपले यथोचित योगदान दिले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, शामी अहमद, आर. विनय कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : ब्रेन्डन टेलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सिकंदर रझा, तेंडई चटारा, मायकेल चिनॉया, एल्टन चिगुम्बुरा, ग्रॅमी क्रेमर, कायले जाव्‍‌र्हिस, टायमीसेन मारूमा, हॅमिल्टन मसाकाझा, नॅटसे म’शांगवे, टिनोटेंडा मुटोम्बोझी, वुसीमुझी सिबांडा, प्रोस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर, सीन विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी १२.३० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट व टेन स्पोर्ट्स.