इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून बीसीसीआयने आर्थिक आघाडीवर यशाचे झेंडे उंचावले आहेत. करोना काळात इतर मंडळ क्रिकेटपटूंचे मानधन कापत असताना बीसीसीआयने याउलट काम केले आहे. आता बीसीसीआयची तिजोरी पुन्हा भरली जाणार आहे, कारण आयपीएलच्या पुढील हंगामासाठी बीसीसीआय दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे, ज्यांची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

क्रिकबझच्या अहवालानुसार इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे १८०० कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य २२०० ते २९०० कोटीपर्यंत जाईल. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत २७०० ते २८०० कोटी रुपये आहे तर, चेन्नई सुपर किंग्ज २२००-२३०० कोटींची टीम आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सची किंमत १८५५ कोटी रुपये आहे.

हेही वाचा – २६ वर्षीय प्रणती नायकला मिळालं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट!

माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या दोन नव्या संघांचा लिलाव पुढच्या महिन्यात जुलैमध्ये होऊ शकतो. बीसीसीआय यावर काम करत आहे. आयपीएल २०२२मध्ये खेळणारी एक नवीन टीम अहमदाबादची असू शकते. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमही अहमदाबाद येथे बांधले गेले आहे. आयपीएल २०२१चे काही सामनेही येथे खेळले गेले. गुजरात लायन्सही आयपीएलचा एक भाग होती. उत्तर प्रदेशचा संघही आयपीएल २०२२ मध्ये येऊ शकतो. आठपेक्षा अधिक संघ आयपीएलमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. २०११ मध्ये १० संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता तर, पुढील दोन हंगामात नऊ फ्रेंचायझींचा सहभाग होता.