Narendra Modi On Womens Asia Cup Win: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने विजय तर मिळवला, पण विजयानंतर पुन्हा एकदा ट्रॉफीवरून वाद पेटला. भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पोस्ट शेअर करून भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले, “भारतीय क्रिकेटसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आशिया चषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत त्यांचा आत्मविश्वास, सातत्य आणि जोश स्पष्टपणे दिसून आला. आशा आहे की, हा विजय देशभरातील लाखो तरुणांना आणखी चांगलं खेळण्यासाठी आणि आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी करण्यासाठी प्रेरणा देईल.”

यासह देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पोस्ट शेअर करून भारतीय संघाचं कौतुक केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “भारतीय संघाने आशियाई क्रिकेटमध्ये आणखी एक शिखर गाठलं आहे. आठव्यांदा महिला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद उंचावल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही दमदार कामगिरी केली. तुम्ही लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.”

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १८३ धावा केल्या. भारतीय संघाकडून स्मृती मानधनाने ५९ आणि शफाली वर्माने ६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय संघाचा ट्रॉफी घेण्यास नकार

याआधी भारतीय संघाने २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी देखील भारतीय संघाने मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यावेळी भारतीय संघाने श्रीलंकेला हरवलं, पण ट्रॉफी देण्यासाठी एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी आले, त्यामुळे यावेळीही भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला.