Prince Yadav Dream Ball to Clean Bowled Virat kohli: लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात प्रिन्स यादवच्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं. प्रिन्स यादवने खुद्द किंग कोहलीला कमालीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत सर्वांनाच चकित केलं. चेसमास्टर विराट कोहली धावांचा पाठलाग करताना डकवर बाद झाला. लखनौने आरसीबीला विजयासाठी १९ चेंडूत २१३ धावांचं आव्हान दिलं आहे आणि विराटच्या विकेटसह संघाची सुरूवात खराब झाली आहे.
आरसीबीने सामन्याची नाणेफेक जिंकत लखनौला फलंदाजीसाठी पाचारण केलं. लखनौने मिचेल मार्शच्या शतकी खेळीच्या बळावर धावांचा डोंगर उभारला. मिचेल मार्शने या सामन्यात ५६ चेंडूत ९ चौकार व ९ षटकारांसह १११ धावांची वादळी खेळी केली. यानंतर निकोलस पुरनने २३ चेंडूत ३८ धावांची तर ऋषभ पंतने सर्वात प्रभावी खेळी केली. पंतने १० चेंडूत ३२ धावा करत लखनौ संघाला १९ षटकांत २०९ धावांचा पल्ला गाठून दिला.
पावसामुळे सामना पहिल्या डावात ३ वेळा थांबला होता, त्यामुळे हा सामना १९ षटकांचा खेळवला जात आहे. डीएलएस पद्धतीनुसार आरसीबीला विजयासाठी २१३ धावांचं आव्हान मिळालं. यासह आरसीबीकडून जेकब बेथल व विराट कोहली फलंदाजीला उतरले. बेथल पहिल्याच षटकात ४ धावा करत बाद झाला. यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी प्रिन्स यादव आला.
प्रिन्स यादवचा ड्रीम बॉल अन् विराट कोहली क्लीन बोल्ड
प्रिन्स यादवने दुसऱ्याच चेंडूवर किंग कोहलीला बोल्ड केलं. प्रिन्सने विराटला पहिलाच चेंडू बाहेर जाणारा टाकला. यानंतर त्याने १४०.४ किमी प्रतितास वेगाने आत येणारा अप्रतिम चेंडू टाकला. विराट पुढे सरसावत बचावात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू सीमवरून आत आला आणि बॅट-पॅडमधून थेट ऑफ स्टंप उडवून गेला. अतिशय सुंदर चेंडूवर विराटचा त्रिफळा उडाला. विराट कोहली बाद झाल्याचं पाहून स्वत: चकित झाला.
चेस मास्टर विराट कोहलीला क्लीन बोल्ड केल्याचं पाहताच प्रिन्स यादवचा गगनात मावेनासा झाला. त्याने आनंदाने हवेत उडी मारत या विकेटचा जल्लोष केला आणि आभाळाकडे पाहत देवाचे आभार मानले.
